
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
स्त्राrलाही कामभावना आहे, ही वस्तुस्थिती समाजासमोर उघडपणे मांडणं हे कृत्य आजही समाजाला फारसं न पटणारं. मग स्त्राrला कायमच सोशिकतेच्या पिंजऱ्यात चिणून टाकणाऱ्या 90-95 वर्षांपूर्वीच्या समाजात तर निषेधार्हच होतं. मात्र तरीही विभावरी शिरुरकर यांनी आपल्या धीट लेखणीतून स्त्रीच्या आत्मभानाचा उद्गार जागृत ठेवला. आजच्या जागतिक महिला दिनाची वाट अशा लेखिकांनी सुकर केली आहे.
स्त्रियांच्या औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाल्यावर जवळजवळ पाऊण शतकानंतर पुण्यात महर्षी कर्व्यांच्या प्रेरणेनं महिला विद्यापीठ सुरू झालं ते 1916मध्ये. पदवीधर झालेल्या स्त्रियांना अर्थार्जनाची आवश्यकता वाटू लागली. स्त्री शिकली, अर्थार्जन करू लागली तेव्हा आता स्त्रियांच्या प्रश्नांची धार कमी होईल, तिच्या वाटय़ाचे दुःख कमी होईल, अशी आशा वाटत असताना ती कल्पना भ्रामक ठरली आहे, हे दाखवून दिलं विभावरी शिरुरकर यांच्या ‘कळ्यांचे निश्वास’ या संग्रहातील कथांनी!
हा संग्रह प्रकाशित झाला 1933मध्ये. शीर्षक सांगते त्याप्रमाणे खरोखरीच यातील सर्व 10 कथा स्त्री केंद्री आहेत आणि प्रत्येक कथेच्या नायिकेला कोणत्या नं कोणत्या समस्येनं ग्रासलं आहे. या सर्व नायिका सुशिक्षित आहेत. आधुनिक विचारांशी त्यांचा परिचय झालेला आहे. त्यांचं आत्मभान जागं झालेलं आहे. समकालीन प्रश्नांना सामोरे जाण्याचा प्रयत्न स्त्रिया साहित्यामधून करू लागल्या होत्याच. पण हा संग्रह मात्र अत्यंत स्फोटक ठरला.
बालविवाहाचा काळ आता मागेच पडला होता. समाजात तुरळक प्रमाणात का होईना प्रौढ कुमारिका दिसत होत्या. त्यांच्या समस्यांची अत्यंत धीट मांडणी या कथांमधून विभावरी शिरुरकर यांनी केली. ती करताना त्यांना – म्हणजे बाळूताई खरे यांना विभावरी शिरुरकर हे नाव घ्यावे लागले होते! इतकी धाडसी मांडणी करताना टोपण नाव घ्यावे लागले, यातच त्या काळातील समाज स्थितीची कल्पना आपल्याला येते. कुटुंबनियोजनाच्या प्रसाराची मंदगती, घरात अनेक मुले, वडील पेन्शनीत. अशा कुटुंबातील जर मोठी मुलगी मिळवती असेल तर तिच्यावर वडिलांच्या संसाराचा भर पडत असे आणि तिच्या विवाहाविषयी घरची मंडळी उदासीन असत. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ आणि ‘त्याग’ या कथांतून विभावरींनी खणखणीत प्रश्न विचारला आहे.
प्रौढ आणि समंजस मुलीच्या प्रेमात येणाऱया अडचणी, जाती-पोटजाती यांचं प्रस्थ, लग्नाच्या बाजारात मुलीच्या रुपाला असलेला भाव, प्रेम भावना आणि शरीरसंबंध यांतले नाते यांसारखी आशयसूत्रे असलेल्या या कथांनी त्या काळात मोठी खळबळ उडवली होती. इतकी की पुस्तकाचे प्रकाशक मोटे यांच्याकडे पत्रांचा पाऊस पडला. कोण ही विभावरी, स्त्राr की पुरुष अशी विचारणा होऊ लागली. स्त्राrला देवता ठरवून तिला एका चौकटीत बंदिस्त करण्याच्या परंपरेला प्रश्न विचारण्याचं धाडस समाजाला खपलं नव्हतं. स्त्रीलाही कामभावना आहे, ही वस्तुस्थिती जणू प्रथमच समाजाच्या समोर इतक्या उघडपणे ठेवली गेली होती. तीही एका स्त्रीने! हे कृत्य समाजाला निषेधार्ह वाटत होतं.
‘कळ्यांचे निश्वास’मधील कथांमधून प्रथमच स्त्रीच्या आत्मभानाचा उद्गार निघाला.स्त्रीला कायमच सोशिकतेच्या पिंजऱयात चिणून टाकणाऱ्या समाजाला हा मोठा धक्का होता. त्या काळातील बहुसंख्य समाजाची गतानुगतिक दृष्टी आणि पारंपरिकतेचा पगडा यांमुळे अत्यंत जहाल टीका त्यांच्यावर झाली. अर्थात काही विवेकी लोकांनी विभावरींनी मांडलेल्या समस्यांचा सहानुभूतीने विचारही केला आहे.
‘स्त्रीही माणूस आहे आणि संसार हा सहयोग आहे,’ ही मूल्यविषयक जाणीव त्यांनी प्रथम रुजवली. चार घटका करमणूक करण्याच्या प्रवृत्तीमधून त्यांनी कथेला खेचून बाहेर काढले आणि तिला वास्तवदर्शनाच्या मार्गावर प्रस्थापित केले, असं त्यांच्याविषयी प्रख्यात समीक्षक कुसुमावती देशपांडे यांनी गौरवपर म्हटलं ते खरंच आहे! आज या गोष्टी आपल्याला सहजसाध्य वाटतात. पण 1930चा काळ लक्षात घेतला तर हे किती मोठं धाडस होतं, हे लक्षात येईल. शिक्षणामुळे विचारात बदल होऊ लागले होते; पण ते अजून समाजाच्या पचनी पडले नव्हते. प्रौढ विवाह होऊ लागले होते. क्वचित प्रेमविवाहही होऊ लागले होते. उच्च शिक्षण घेतलेल्या, अर्थार्जन करू लागलेल्या स्त्रिया दिसू लागल्या होत्या. स्त्रीच्या नवऱ्याकडून अपेक्षा बदलू लागल्या होत्या. पण त्यांची दखल घेऊन स्वतत बदल करण्याची आवश्यकता पुरुषांना मात्र वाटत नव्हती. त्यामुळे खूप प्रकारचे ताण निर्माण झाले होते. या सर्व परिस्थितीचं आकलन या कथांतून प्रथम त्यांनी मांडलं, म्हणून ते मोलाचं!
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)
[email protected]


























































