
डॉ. विलास उजवणे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाही. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तेवढय़ाच ताकदीने त्यांचा वावर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनुभवायला मिळाला. मात्र, मध्यंतरीच्या काळात अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांना हादरा बसला, पण या गंभीर आजारावर धीरोदात्तपणे मात करत डॉ. विलास उजवणे पुन्हा उभे राहिले.
अशा कोणत्याही संकटामुळे त्यांच्यातल्या अभिनयाची धार कमी होऊ शकत नाही, हेच दाखवून देण्यासाठी आगामी ‘कुलस्वामिनी’ चित्रपटातून डॉ. विलास उजवणे त्यांच्या अभिनयाचे पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच या चित्रपटाचा भक्तिरसाने परिपूर्ण असा ट्रेलर लाँच करण्यात आला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देवी मातेच्या अगाध लीलेचे दर्शन प्रेक्षकांना घडवणारा ‘कुलस्वामिनी’ हा चित्रपट येत्या 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

























































