डॉ. य. बा. दळवी गौरव ग्रंथ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित

306

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. य. बा. दळवी गौरव ग्रंथ ‘आजकालचा महाराष्ट्र ’याचे प्रकाशन ओरोस येथे स्थानिक खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार डॉ. य. बा. दळवी हे 19 फेब्रुवारी रोजी 95 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याचे औचित्य साधून त्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. दळवी गौरव ग्रंथ समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. 1963 (कणकवली) आणि 1977 (मालवण-कणकवली) या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले डॉ. दळवी हे थोर समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै आणि हिंदुस्थानचे माजी अर्थ तसेच रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांचे अनुयायी आहेत.

या छोटय़ाशा समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण असेच कार्यरत रहा. आपणास दीर्घायुरारोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. आपले कार्य पुढच्या पिढय़ांना आदर्शदायी ठरो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी ग्रंथ समितीचे अध्यक्ष जे. जे. दळवी, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आणि डॉ. दळवी यांचे सुपुत्र रणजित दळवी, निवृत्त पोलीस अधिकारी जयवंत गांवकर आणि संजय दळवी असे गांवातील मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या