कंटेनरच्या केबिनमध्ये स्टोव्हचा भडका, चालकाचा होरपळून मृत्यू

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

ट्रक टर्मिनलमध्ये उभ्या असलेल्या कंटेनरच्या केबिनमध्ये स्टोव्हवर स्वयंपाक करत असताना अचानक भडका उडाल्याने बदली चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना गुरुवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास घडली. चालकाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील शिवाजी काकडे (४०) हा बदली वाहनचालक आहे. चार दिवसांपूर्वी शिवशक्ती ट्रान्सपोर्टमध्ये कामासाठी आला होता. कामगार चौकातील ट्रक टर्मिनलवर गुरुवारी मध्यरात्री तो कंटेनर (एमएच-२०-डी.ई-७८५७) स्टोव्हवर स्वयंपाक करत असताना साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक स्टोव्हचा भडका उडाला. भडक्यात शिवाजीसह कंटेनरच्या केबिनने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार पवार, चालक दाभाडे यांच्या पथकाने धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. जवानांनी अवघ्या काही तासांत आग विझवली. आगीत कंटेनरचे केबिन आणि शिवाजी काकडे होरपळले गेले होते.

पोलिसांनी पहाटे पाच वाजता शिवाजी काकडे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, एकंदरीत हे प्रकरण संश्यास्पद वाटत असून, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तो खरोखरच स्टोव्हवर जेवण बनवत होता की त्याला पेटवून देण्यात आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार खंडागळे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.