
सामना ऑनलाईन, ठाणे
खाडीकिनारी असलेली खारफुटी वाचवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विशेष समिती स्थापन करण्याबरोबरच या खारफुटीवर आता ड्रोनचा वॉच राहणार असून अत्याधुनिक यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. 50 मीटर क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांवरदेखील कारवाई केली जाणार असून माफियांचे धाबे दणाणले आहेत.
आतापर्यंत ड्रोनचा वापर ठाण्यात मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी करण्यात आला होता. तसेच काही महत्त्वाची छायाचित्रे टिपण्यासाठीदेखील त्याचा वापर झाला. आता खारफुटी वाचवण्याकरिता ड्रोनची मदत होणार आहे. ज्या ठिकाणी एक हजार चौरस मीटर क्षेत्रापेक्षा खारफुटीचे क्षेत्र जास्त आहे तेथे 50 मीटरच्या ना बांधकाम क्षेत्रात उभी असलेली बांधकामे तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकतीच एक बैठक आयोजित केली.
सर्वेक्षण करणार
ठाण्याला एक हजार चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त मोठे खाडी क्षेत्र लाभले आहे. याठिकाणी खारफुटी तोडून माफियांनी इमले उभारले. तर काही ठिकाणी झोपडय़ा परप्रांतीयांना विकण्यात आल्या आहेत. ही बांधकामे करताना खारफुटीची कत्तल करण्यात आली. आता या माफियांची काही खैर नाही. कारण ड्रोनद्वारे वॉच ठेवून बेकायदा बांधकामे कुठे झाली आहेत याचा सर्व्हे केला जाणार आहे.
अशी आहे उपाययोजना
- महापालिकाहद्दीची सॅटेलाइट प्रतिमा तयार करणार.
- खारफुटीच्या क्षेत्राचे ड्रोन कॅमेऱयाद्वारे चित्रीकरण.
- अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून संरक्षक भिंत.
- तक्रार निवारण प्रणाली.
- पालिका आयुक्त दर आठवडय़ाला आढावा घेणार.
- नालासोपाऱयातील डॉक्टरांनी दिले जीवदान




























































