
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
राज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मोबाईलचे पुरावे ग्राह्य
अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱयांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास तो पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पीकनिहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
विम्याचे पैसे वेगळे मिळणार
या आपत्तीच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडेही वित्तीय सहाय्य मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तथापि, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत देईल. राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांनाही विमा कंपन्यांनी तत्काळ मदत करावी यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.



























































