संभाजीनगर जिल्ह्यात भीषण दुष्काळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

दुष्काळाच्या सर्वेक्षणाच्या नव्या कार्यपद्धतीनुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच राज्य सरकारला पाठविण्यात आला असून, या अहवालात भीषण दुष्काळ असल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. कृषी विभागाच्या या अहवालावर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील दुष्काळ घोषित करण्याच्या निकषांमध्ये व कार्य पद्धतीमध्ये सरकारने बदल केला आहे. नवीन निकषानुसार दुष्काळाचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील १३६ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम कृषी विभागाने सुरू केले होते. मूल्यांकनाच्या दुसऱ्या कळीच्या सर्वेक्षणाचे काम मागील आठवड्यात पूर्ण केले होते. हे सर्वेक्षण वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता व जल उपलब्धता यापैकी तीन निर्देशांकानुसार करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २८ मंडळे आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील संभाजीनगर, गंगापूर, कन्नड, रत्नपूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर या तालुक्यांतील रॅण्डम पद्धतीने १३६ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांतील प्रमुख दहा पिकांची निवड करून त्याचा पहिला सर्वेक्षण अहवाल पीक विमा योजनेअंतर्गत पीक कापणी प्रयोगाकरिता वापरले जाणारे अ‍ॅप वापरून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात पीक परिस्थितीचा आढावा फोटोसहित टाकण्यात आला आहे. त्यात फॉर्म अ व ब भरून घेण्यात आले असून, हा फॉर्म अपलोड करण्यात आला.

सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दुष्काळी स्थितीच्या मोजमापाची प्रक्रिया पूर्ण भीषण दुष्काळ असल्याचा जिल्हा प्रशासन, कृषी आयुक्तालयांनाही पाठविण्यात आला आहे. हा अहवाल राज्य शासनाला दिल्यानंतर राज्य शासनाने केंद्राला पाठविल्यानंतर केंद्राचे पथक प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येऊ शकते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली.