राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्याच्या अनेक भागांत आग ओकणारा सूर्य, वाढते तापमान, आटत चाललेले विहिरींतील पाणी, कोरडय़ा होत चाललेल्या नद्या, खालावत चाललेली धरणांतील पाण्याची पातळी व खालावलेली भूजल पातळी यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्याच्या महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.

राज्याच्या अनेक भागांत पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे. राज्यातील सुमारे 201 तालुक्यांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवडय़ातील राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्री व पालकमंत्र्यांच्या त्यांच्या भागातील पाणी व इतर परिस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. राज्यातल्या 32 जिह्यांतल्या 201 तालुक्यांतील परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवून घेतला आहे. फक्त मुंबई शहर, उपनगर जिल्हा, ठाणे व गडचिरोली जिह्याला या सर्वेक्षणातून वगळण्यात आले आहे.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुष्काळसदृश तालुक्यांतील लोकांसाठी मदत घोषित करण्यात येईल. दुष्काळसदृश किंवा टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केल्यावर केंद्रातील पथक महाराष्ट्राला भेट देऊन पाहणी करील. त्यानंतर सर्व परिस्थितीचा अभ्यास करून प्रत्यक्ष दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा होईल. कारण केंद्रीय पातळीवर दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली जाते असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांना सवलती जाहीर

दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्यावर त्या भागातील शेतकऱ्यांना आठ विविध प्रकारच्या सवलती जाहीर होतात. त्यात शेतसारा माफ करण्यापासून कृषिपंपांच्या वीज बिलांवर 33 टक्के सवलत, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना फीमाफी, कर्जवसुलीवर स्थगिती, गावांना टँकरने पाणीपुरवठा, विजेचे बिल भरले नसले तरी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात नाही, रोजगार हमी योजनेत शिथिलता व पतपेढय़ांमधून घेण्यात आलेल्या कर्जाची पुनर्रचना अशा विविध सवलती जाहीर केल्या जातात.