चंदगडच्या बसर्गे गावातून सुरू झाला ड्रग्सनिर्मितीचा व्यवसाय, ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाइंड राजकुमार राजहंस याच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. आतापर्यंत फक्त ढोलगरवाडी हेच ड्रग्स निर्मितीचे मूळ केंद्र या हिशेबाने पोलीस तपास करीत होते. मात्र, दुसऱ्य़ा टप्प्याच्या तपासात आरोपी राजकुमार राजहंस आणि निखिल लोहार यांना घेऊन मुंबई पोलीस पुन्हा चंदगडमध्ये दाखल झाले आणि बऱ्य़ाच प्रश्नांची उत्तरे मिळाली. ढोलगरवाडीला झालेली कारवाई पाहता राजहंस हाच या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असलेला माणूस आहे. मात्र, या ड्रग्ज प्रकरणाचे मूळ मार्च 2020 मध्ये चंदगड तालुक्यातीलच बसर्गे गावात असल्याचे समोर येत आहे.

मार्च 2020 मध्ये डीआरआय या केंद्र सरकारच्या तपासयंत्रणेने मुंबईनजीक असणाऱ्य़ा पालघर जिल्ह्यात ड्रग्सविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत जवळपास पाच कोटी रुपयांचे तब्बल 483 किलो एफीड्रिन नावाचे ड्रग्स जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण तिघांना अटक करण्यात आली. यात राकेश खाणीवडेकर या बेळगावच्या तरुणाचाही समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे त्याने बसर्गे गावातल्या सुधीर पाटील यांची पोल्ट्री व्यवसायासाठी चालवायला घेतली होती. ही पोल्ट्री घेताना मध्यस्थ म्हणून ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वकील राजकुमार राजहंस याने भूमिका निभावली. त्यानंतर राकेश खाणीवडेकर म्हणजेच रॉकीला ती पोल्ट्री देण्यात आली.

रॉकीने या पोल्ट्रीचा वापर ड्रग्स सिंडीकेट सुरू करण्यास करायला सुरुवात केली. इथेच निखिल लोहारचा थेट संबंध पहिल्यांदा आला. या पोल्ट्रीची देखभाल करण्यासाठी म्हणून अगदी त्यावेळीही निखिल लोहार केअरटेकर म्हणून काम पाहत होता. फक्त त्याला त्यावेळी ड्रग्स निर्मिती करण्याचे ज्ञान नव्हते. पालघरमध्ये डीआरआयने केलेल्या कारवाईनंतर तपासादरम्यान डीआरआयने मुंबई, बेळगाव आणि चंदगडमधील बसर्गे गावात रॉकी चालवत असलेल्या या पोल्ट्रीवर धाड टाकली. यात ड्रग्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य, लॅबोरेटरी आणि इतर साहित्य जप्त करून ही पोल्ट्री सील करण्यात आली.

निखिल त्यावेळी फक्त पोल्ट्रीचा केअरटेकर होता. राजहंसचा या प्रकरणाशी संबंध नव्हता. त्यामुळे दोघांनाही या कारवाईची झळ बसली नाही. रॉकीला डीआरआयकडून अटक झाली. तो आजही मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात आहे. मात्र, 2020 ला झालेल्या या कारवाईनंतर ड्रग्सचा व्यवसाय आणि त्या व्यवसायातून मिळणारे अफाट पैसे पाहून राजहंसच्या मनात लालसा निर्माण झाली. निखिल लोहार त्यावेळी केअरटेकर होता, पण ड्रग्स बनवण्यासाठी साधनसामग्री आणि इतर प्रक्रिया त्याला बऱ्य़ापैकी समजली होती. बसर्गे पोल्ट्रीत रॉकीने या ड्रग्स निर्मितीसाठी एक लॅब उभारली होती. ज्यात अधूनमधून निखिल डोकावून बघत होता. हे नक्की काय सुरू आहे या उत्सुकतेपोटी निखिलने बघूनच थोडीफार प्रक्रिया समजून घेतली. त्याचा फायदा घेण्याचे वकील राजकुमार राजहंसने ठरवले. इथूनच ड्रग्स निर्मितीच्या कल्पनेने राजहंस कामाला लागला. अगदी कमी वेळातच रॉकीच्या अटकेनंतर राजहंसने मुंबईतील आणखी काही पेडलर्स आणि ड्रग्स निर्मिती करणाऱ्य़ा लोकांच्या संपर्कात राहून यंत्रणा उभारली. येथूनच ढोलगरवाडी गावातल्या राजहंसच्या फार्महाऊसवर ड्रग्स फॅक्टरीचा उदय झाला.

राजहंस आणि निखिलने मध्यंतरी डीआरआयने सील केलेल्या बसर्गे फॅक्टरीमधील सील केलेले साहित्य पोल्ट्रीचे पत्रे फोडून चोरले. त्यातून सगळी साधनसामग्री ढोलगरवाडीच्या फार्महाऊसवर आणली. एमडी ड्रग्स बनवण्यासाठी लागणारे काही केमिकल राजहंसने बेळगाव, मुंबई आणि गडहिंग्लज शहरातून आणले. जे केमिकल बेकायदेशीर विकल जाते त्या केमिकलची व्यवस्थासुद्धा राजहंसने मुंबईतून केली. स्वतःच्याच गाडीने ते फार्महाऊसवर नेले. हा सगळा प्रकार सुरू असताना काही पेडलर्स राजहंसला मदत करत होते.

निखिल लोहारला मिळायचे महिन्याला केवळ 10 हजार

राजहंसने अल्पावधीतच ढोलगरवाडी फार्महाऊसवर ही लॅब उभारली. काही पेडलर्स लोकांना आणून कच्चे ज्ञान असणाऱ्य़ा निखिल लोहारला ड्रग्स निर्मिती करण्यात पारंगत केले. बसर्गे पोल्ट्रीत ड्रग्स बनत असताना रॉकी नक्की काय करायचा याचे थोडेफार ज्ञान असलेला निखिल लवकरच या कामात तरबेज झाला आणि ड्रग्सच्या खऱ्य़ा व्यवसायाला सुरुवात झाली. निखिल जमेल त्या प्रमाणात एमडी ड्रग्स बनवत असे. त्याची निर्यात करण्यात राजहंस महत्त्वाची भूमिका बजावत होता. निखिल जे बनवत होता ते कोणते ड्रग्स आहे, त्याची बाजारभावात काय किंमत आहे, याची कल्पना नसणाऱ्य़ा निखिल लोहारला महिन्याकाठी राजहंस फक्त 10 हजार रुपये पगार देत होता. निखिलने पोलिसांच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार त्याला महिन्याला 10 हजारांच्या वर महिन्याला एक रुपयाही जास्तीचा मिळाला नाही. निखिलने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, त्यामुळे तो स्वतंत्र राहतो. आई-बाबा, बहीण, भाऊ सगळे असूनही तो सगळ्यांपेक्षा लांब होता. त्याला 9 महिन्यांचे बाळही आहे.