
सामना प्रतिनिधी । मुंबई
ऑनडय़ुटी दारू ढोसून नशेत तर्र झाल्यानंतर रिक्षाचालकांकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसाला दारू चांगलीच महाग पडली आहे. सुभाष पवार असे त्या अंमलदाराचे नाव असून तो गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पवार याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. २४ जूनला गोरेगाव पोलीस ठाण्याच्या मोबाईल १ या गाडीवर ड्युटीवर असताना तो दारूच्या नशेत तर्र होऊनच ड्युटीवर आला. त्याने थेट रिक्षाचालकांना दमदाटी करत पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. ही बाब कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पवार याला कशाचीही शुद्ध नव्हती. त्याने आपल्या वरिष्ठालादेखील उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली. याची गंभीर दखल घेत पवार याला सेवेतून निलंबित करण्यात आले.



























































