
अतिवृष्टीमुळे बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट असतानाच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यासाठी जीवनवाहिनी असलेल्या सोमठाणा येथील निम्न दुधना प्रकल्पात मागील 10 ते 12 वर्षानंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जवळपास दोन फूट पाणीसाठा झाला असून पाण्याची आवक वाढत आहे. या धरणावर या तालुक्याचे सिंचन व पाणी पुरवठा अवलंबून असल्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे दुधना नदीवर निम्न दुधना प्रकल्प आहे. या प्रकल्पावरच बदनापूर तालुक्यातील शेती अवलंबून असते. हा प्रकल्प पूर्णपणे भरल्यास बदनापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पिण्याचा पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न सुटतो. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास या कालव्याद्वारे जवळपास 15 किलोमीटर असलेल्या अंबडगावपर्यंत पाणी जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीच्या सिंचनाचाही प्रश्न निकाली निघतो. मागील कित्येक वर्षापासून हा प्रकल्प पूर्ण भरलेला नाही. मागील पाच ते सात वर्षापासून या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. यंदा मात्र तालुक्यात मृग नक्षत्रापासून पावसाने बरसण्यात सुरुवात केलली आहे. तालुक्यातील काही मंडळात तर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
बदनापूरसाठी महत्त्वाच्या असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मागील 10 ते 12 वर्षानंतर पहिल्यांदा या प्रकल्पात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास दोन फूट पाण्याची आवक झाली आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 15 फूट असून अशीच आवक राहिल्यास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार आहे. सोमठाणा धरणात पाणी साठा नसल्यामुळे मागील एक ते दोन वर्षात विविध सामाजिक संघटना व महसूल प्रशासनाने जवळपास 5 हजार ब्रास गाळ या धरणातून काढल्यामुळे यंदा पाणी साठ्यातही वाढ होणार आहे.



























































