
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये 25 गिधाडांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेची (IVRI) मदत घेतली आहे. वन विभागाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.
मंगळवारी भिरा रेंज अंतर्गत सेमरई गावाजवळील शेतात या गिधाडांचे मृतदेह आढळून आले. ही गिधाडे ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ अंतर्गत संरक्षित असून, अत्यंत संकटग्रस्त (critically endangered) प्रजातींमध्ये त्यांचा समावेश होतो. प्राथमिक माहितीनुसार, मृत गिधाडांपैकी बहुतेक ‘हिमालयीन ग्रिफॉन’ प्रजातीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुधवा बफर झोनच्या उपसंचालिका कीर्ती चौधरी यांनी सांगितले की, 25 गिधाडे मृत अवस्थेत आढळली, तर आणखी ५ गिधाडे बेशुद्ध अवस्थेत सापडली. या जखमी गिधाडांवर तातडीने उपचार करण्यात आले आणि ती उडण्यास सक्षम झाल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
घटनास्थळी काही अंतरावर कुत्र्यांचेही मृतदेह आढळून आले. गिधाडांनी हे मृत कुत्रे खाल्ल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कुत्र्यांच्या मृतदेहांमध्ये विषारी पदार्थ असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले होते. डॉ. दया शंकर, डॉ. अंकुर आणि डॉ. राजेंद्र सिंह यांनी 23 गिधाडांचे शवविच्छेदन केले. उर्वरित 2 गिधाडांचे मृतदेह तसेच 23 गिधाडांचे अवयव (विसेरा) पुढील तपासणीसाठी बरेली येथील IVRI कडे पाठवण्यात आले आहेत. ही कारवाई दुधवा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि मुख्य वनसंरक्षक डॉ. एच. राजामोहन यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.
शवविच्छेदनात गिधाडांच्या मृत्यूमागे विषबाधा असल्याचे संकेत मिळाले असले, तरी नेमके कोणते विष वापरण्यात आले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. दया शंकर यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कुत्र्यांच्या मृतदेहांमध्ये विषारी पदार्थ असल्याचे दिसून आले आहे आणि तेच गिधाडांच्या मृत्यूचे कारण असावे.
या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत संकटग्रस्त गिधाडांच्या मोठ्या प्रमाणातील मृत्यूमुळे परिसंस्थेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता IVRI कडून येणाऱ्या अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































