पावसामुळे मशागतीची कामे ठप्प; शिराळा तालुक्यातील भाजीपाला, फुले सडली

तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तर, मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भाजीपाला व फुले सडून गेली आहेत.

शिराळा तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, विहिरी, तलाव, धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, जनावरांच्या पाण्याची चिंता तुर्तास तरी मिटली आहे.

” यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने तसेच पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जून महिन्याच्या पूर्वार्धातच पाझर तलावात पाणीसाठा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. साधारणतः या महिनाभरात सरासरी 25 ते 45 टक्के पाणीसाठा वाढल्याने तलाव परिसरात असणाऱ्या सिंचन विहिरी व कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. निश्चितच याचा लाभ अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता फायदा होणार आहे.
– प्रवीण तेली, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शिराळा