अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे दिंडोशीत लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरणे कठीण – सुनील प्रभू

दिंडोशी मतदारसंघात पाण्याचा अत्यंत अपुरा पुरवठा आहे. सणासुदीला पाणी मिळत नाही. रहिवासी संतप्त होऊन रस्त्यावर उतरलेत. लोकप्रतिनिधींना फिरणे कठीण झाले आहे. भविष्यात अनुचित प्रकार घडला तर त्याला मुख्यमंत्री व पालिका आयुक्त जबाबदार असतील, असा इशारा शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत दिला.

नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यावर बोलताना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दिंडोशीतील विविध समस्या मांडल्या. जोगेश्वरी ट्रॉमा सेंटरच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. कांदिवली शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम अर्धवट पडल्याचे सांगितले. सरकारने पीटीसी म्हणून बांधलेली घरे महापालिकेला पीएपी म्हणून देण्याची आणि एसआरए योजनेत तळमजल्यावरच्यांसोबत वरच्या मजल्यावरील लोकांनाही घरे देण्याची मागणी केली. मुंबईतील प्रदूषणामुळे 80 टक्के लोकांना घशाचे विकार झाले आहेत. प्रदूषण वाढल्यावर या सरकारने रस्ते धुतले, पण ऑडिट रिपोर्टनुसार 600 कोटी रुपये स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईसाठी खर्च केले, पण वाया गेले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अपुऱ्या पाणीपुरवठय़ावर बोलताना ते म्हणाले की, दिंडोशीत चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे दशलक्ष लिटरची आहे. आज सध्या तीन हजार आठशे ते चार हजार दशलक्ष लिटर पाणी देतो. लोकांना आंघोळीला पाणी नाही. सरकारला पाझर फुटत नाही. सरकार गेंडय़ाच्या कातडीचे आहे. दरवर्षी पाचशे ते हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ासाठी शासनाने कोणतीही तरतूद केलेली नाही.