विजयादशमीच्या दिवशी दुर्गामाता दौडचा समारोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या नवरात्रातील दुर्गामाता दौडचा समारोप शहरातील अष्टभूजा देवी मंदिरातील सभागृहात आरतीने पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, नवरात्रीचे नऊ दिवस यावर्षीही दररोज सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या भागात दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात मुली व महिलांची संख्याही लक्षणीय होती. भगवे फेटे आणि ध्वज हाती घेतलेल्या युवक-युवतींमुळे वातावरणात उत्साह संचारला होता.

शहरातील शिवाजी चौक ते शिवाजी पुतळा, शिवाजी चौक ते नागराज कॉर्नर, आर.आर. पेट्रोल पंप ते रामकृष्णनगर, पारदेश्वर मंदिर व रंगनाथनगर पट्टा, रायगड कॉर्नर ते प्रभावतीनगर, सिंचननगर, गणपती चौक ते त्रिमूर्तीनगर आणि शिवाजी चौक ते अष्टभूजा मंदिर या परिसरात या दौडीचे नऊ दिवस आयोजन करण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध रीतीने ही दौड पार पडली. दरम्यान, एक दिवस सातव्या माळेच्या दिवशी गणपती चौकातील सिंचननगर येथील दौडी दरम्यान पोलीस प्रशासनाने आक्षेप घेतला होता. शिवप्रतिष्ठानचे धारकरी शंकर देशमुख यांना पोलीस ठाण्यात बोलावून समजही दिली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यात मध्यस्थी करुन दुसऱ्या दिवशी पुन्हा ही दौड पूर्ववत सुरु केली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय जाधव हे स्वत: या दौडमध्ये सहभागी झाले होते. भगवा ध्वज हाती घेऊन स्वत: खासदार जाधव यांनी या दौडमध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर विजयादशमीच्या दिवशी शहरातील शिवाजी चौकातून ही दौड निघून अष्टभूजा मंदिरात याचा समारोप झाला. दरम्यान, समारोपालाही शहरातील असंख्य धारकरी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून परभणीतही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने या दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. यानंतर पुढील वर्षीही असाच उपक्रम राहणार असल्याचेही सहभागी धारकऱ्यांनी सांगितले.