Photo – शिर्डीत रामनवमी उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात, ‘साई रामा’च्या जयघोषात साईनगरी दुमदुमली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डी येथे अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांच्या फोटोची, पोथीची आणि विणाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी विणा धारण केला होता. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अत्यंत श्रद्धेने पोथीची पालखी सांभाळली, तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी श्रींचा फोटो घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. या मंगलप्रसंगी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांच्यासह मंदिराचे पुजारी उपस्थित होते. शिर्डी ग्रामस्थ आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले साईभक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘साई रामा’च्या जयघोषात ही मिरवणूक संपन्न झाली.