इंग्लंडच्या शेपटाचा तडाखा

1
3

>> द्वारकानाथ संझगिरी 

ओव्हल कसोटीत इंग्लंडच्या शेपटाने देवमाशासारखा तडाखा हिंदुस्थानी संघाला मारला. त्याच्याकडे कसं पाहायचं?

हातातून ओला साबण सुटावा तशी इंग्लंडवर दबाव टाकायची संधी सुटली. बटलरने हिंदुस्थानी संघाचा भरलेला खिसा हळूच मारला. या दृष्टिकोनातून पाहायचं तर, या मालिकेत हिंदुस्थानी संघ खूपच निष्काळजी वाटला असं म्हटलं पाहिजे. प्रत्येक कसोटीत तेच सुरू आहे. फक्त खिसेकापू बदलतोय. कधी सॅम करण, तर कधी बटलर.

ओव्हलवर बटलर बॉस झाला. आडनावं फसवी असतात हेच खरंय.

मी असं म्हणेन की, या मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी टाकणार्‍या हिंदुस्थानी गोलंदाजांनी स्वहस्तेच इंग्लंडच्या खालच्या फळीतल्या फलंदाजांना मोकाट सोडलं. पहिल्या दिवशी सूर्य पश्चिमेकडे झुकायला लागल्यावर स्विंग गोलंदाजीचं काय प्रदर्शन भरवलं! स्विंग, टप्पा सर्वच मस्त. इशांत या मालिकेत उत्तम गोलंदाजी करतोय आणि बुमराचं प्रत्येक पाऊल पुढे पडतंय. इथल्या एका पत्रकाराने इशांत शर्मा, पुजारा वगैरेंना ‘ट्रोजन हॉर्सेस’ म्हटले. तुम्हाला ट्रोजन हॉर्सची कथा ठाऊक आहे का? ग्रीकांनी एक प्रचंड लाकडी घोडा तयार केला. त्यात काही सैनिक लपले. ट्रोजनने घोडा विजयाची ट्रॉफी म्हणून शहरात नेला. त्यातून रात्री सैनिक बाहेर पडले. त्यांनी दरवाजे उघडले आणि ग्रीकांनी ड्रॉथचं युद्ध जिंकलं. त्यांचं म्हणणं, परदेशी खेळाडू काऊंटीत येऊन खेळतात, अनुभव घेतात आणि ज्ञान आमच्या विरोधात वापरतात. इशांत इथे ससेक्समध्ये खेळायला आला. त्यामुळे त्याला इथे वापरल्या जाणार्‍या ड्युक चेंडूचा सराव झाला. इंग्लिश खेळपट्ट्यांवर कुठला टप्पा ठेवायचा त्याचा अनुभव आणि सराव मिळाला. राऊंड द विकेट गोलंदाजी टाकताना ते सर्व ‘कोन’ त्याने आत्मसात केले आणि इंग्लंडच्या विकेटस् काढल्या. पुजारानेही दोन वर्षे काऊंटीत घाम गाळला. त्याचं फळ त्याला शतकाच्या रूपाने मिळालं.

पण इथे इंग्लंडमध्ये तळाचे फलंदाज कसे बाद करावेत त्याचं शिक्षण मिळत नाही का? विराट कोहलीचं नेतृत्वही त्याक्षणी कल्पनाशून्य वाटायला लागतं. पॅव्हेलियनमध्ये बसलेले चाणक्य, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव करतात काय? तळाच्या फलंदाजांनी एखाद्दोन वेळा भागीदारी करणं आपण समजू शकतो, पण प्रत्येक सामन्यात आपण वरच्या फलंदाजांचा चक्रव्यूह भेदतो, पण बाहेर पडता नाही. त्यामुळे आपण अभिमन्यू होतो आणि कधी करण किंवा बटलर जयद्रथ बनून लाथ मारतो.

हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांना दुसर्‍या दिवशी सकाळी योग्य टप्पा सापडत नव्हता. जर फलंदाजांना खेळायला भाग पाडलं नाही तर विकेटस् कशा मिळणार? पूर्वी तळाच्या फलंदाजांना बाद करताना एक तर उसळता चेंडू टाकला जाई नाही तर यॉर्कर. हल्लीच्या वेगवान गोलंदाजांना यॉर्करचा चांगला सराव आहे, पण तो कसोटीत जास्त का वापरला जात नाही? आपल्याही तळाच्या फलंदाजांनी विशेषतः रिषभ पंतने जोस बटलरकडून बॉस कसं व्हायचं हे शिकलं पाहिजे. या दोन संघांमध्ये ताकदीच्या बाबतीत फार मोठा फरक नाही. फरक एवढाच आहे, इंग्लिश फलंदाजी खाली धावा करते. आपण वर करीत नाही, खालीही करीत नाही. मध्ये विराट कोहली करतो आणि कधी तरी त्याला साथ मिळते. चार-एकने न हरता तीन-दोनने हरून हा फरक आता हिंदुस्थानी संघाने वाढवू नये.