
समाज कल्याण विभागातर्फे समाजमंदिरामध्ये पुस्तक पुरवठाप्रकरणी शासनाचे आदेश येईपर्यंत योजनेस स्थगिती देण्यात आलेली असून याप्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र सहाय्यक समाज कल्याण आयुक्त करण्यामार्फत जिह्यातील निवासी शाळांमध्ये खरेदी करण्यात आलेल्या ई -लायब्ररी प्रकरणावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
पुणे जिह्यातील चार निवासी शाळांमध्ये ई लायब्ररी खरेदी संदर्भात समाज कल्याण उपायुक्त यांनी समाज कल्याण आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. मात्र अद्याप या प्रकरणांमध्ये आयुक्तांकडून कारवाईचे आदेश झालेले नाहीत, परंतु हा विषय विधानसभेत गाजण्याची शक्यता असल्याने ई-लायब्ररी साहित्य खरेदीप्रकरणी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. समाज कल्याण आयुक्तालयामार्फत राज्यस्तरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व समाज मंदिरांच्या व ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीकरीता 36 जिह्यांसाठी 36 कोटी रुपयांची शासनाने मान्यता दिली आहे.

























































