दहशतवाद्यांना थारा देणे बंद करा, इस्लामिक संघटनेच्या परिषदेत स्वराज कडाडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अबु धाबी

हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अबु धाबीमध्ये होत असलेल्या इस्लामिक सहकारी परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत त्यांनी दहशतवादाला पोसणार्‍या पाकिस्तानला खडे बोल सुनावले. स्वराज म्हणाल्या की, “जर आपल्याला माणूसकी वाचवायची असेल तर दहशतवादाला पाठिंबा आणि आर्थिक मदत करणार्‍या देशांना ठणकावले पाहिजे की त्यांनी ही दहशतवादी तळ समूळ नष्ट केले पाहिजे. तसेच दहशतवाद्यांची आर्थिक रसदही त्यांनी तोडली पाहिजे.”

स्वराज म्हणाल्या की, “दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांती असा होतो. अल्लाहच्या 99 नावांमध्ये कुठेही हिंसेचा अर्थ नाही. अशा वेळी सर्व धर्म हे जागतिक शांततेसाठी प्रयत्नशील आहेत.” याच बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी बहिष्कार घातला आहे.

स्वराज पुढे म्हणाल्या की, “जगात, विशेषतः दक्षिण आशियामध्ये दहशतवाद पसरत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असून संपूर्ण जगासाठी दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, 130 कोटी हिंदुस्थानी आणि ज्यात 18.5 कोटी मुस्लिम बंधु भगिनींचा समावेश आह. त्यांच्या शुभेच्छा घेऊन इथे मी आलेले आहे. आमचे मुस्लिम बंधू आणि भगिनी हे आमच्या देशाच्या विविधतेचे एक अविभाज्य घटक आहेत.”

स्वराज म्हणाल्या की, “मी महात्मा गांधींच्या भूमीतून आले आहे. जिथे प्रत्येक प्रार्थना शांतीसाठी संपन्न होते. याचा अर्थ सर्व जगाच्या शांती साठी आम्ही प्रार्थना करतो. मी आपल्या देशातील नागरिक आणि जगातील लोकांसाठी शांती, स्थिरता, आर्थिक विकास, एकता आणि सुख समृध्दीसाठी आमच्या शुभेच्छा आणि सहकार्य देण्यासाठी आले आहे.

सुषमा स्वराज या दोन दिवसीय इस्लामिक सहकारी परिषदेसाठी अबु धाबीला गेल्या आहेत. 57 इस्लामिक देशाच्या संघटनेने पहिल्यांदा हिंदुस्थानला विशेष अतिथी म्हणून आमंत्रण दिले आहे. पुलवामा हल्ला, हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राईक आणि हिंदुस्थान पाकिस्तान तणावात ही बैठक सुरू झाली. हिंदुस्थानला विशेष अतिथीचे निमंत्रण दिल्याने पाकिस्तानने या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची खुर्ची मोकळीच ठेवण्यात आली होती.