
सुमारे 26 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील डायनासॉर नामशेष झाले. भूगर्भात बदल होत खंडांची आणि बेटांची निर्मिती झाली. पृथ्वीवर असे बदल कालांतराने होत असतात. त्यामुळे प्रलयासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सुमारे 2.75 कोटी वर्षांनी पृथ्वीवर महाप्रलय होतो. या काळात पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येतात. पृथ्वी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी असे बदल घडवून आणते. त्यानंतर पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात बदल होतात. संशोधकांच्या मते पृथ्वीची ही श्वास घेण्याची प्रक्रिया असल्याने असे बदल होतात.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील भूगर्भतज्ज्ञ मायकल रॅपिनो आणि त्यांच्या पथकाने याबाबत अभ्यास केला आहे. त्यातून सुमारे 2 कोटी वर्षांनी पृथ्वीवर महाप्रलय येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच 2 कोटी वर्षांनी पृथ्वीची श्वास घेण्याची प्रक्रिया होईल आणि पृथ्वीवर ज्वालामुख्ची उद्रेक, भूकंप, त्सुनामी. काही बेटे पाण्याखाली जाणे अशा नैसर्गिक आपत्ती ओढवतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अशा घटना अचानक होत नाही. त्यांचा विशिष्ट क्रम असतो. पृथ्वीची श्वास घेण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा या घटनांची तीव्रता वाढते, असे मायकल यांनी सांगितले. एखादया व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास तो हातपाय हलवतो, शरीराची हालचाल वेगात करतो, ही अशीच प्रक्रिया आहे. श्वास नियमित सुरू झाल्यावर सर्व शांत होते. त्याचप्रमाणे हा महाप्रलय झाल्यावर पृथ्वीवर सर्व सुरळीत सुरू होते, असेही त्यांनी सांगितले.
पृथ्वीच्या या श्वास घेण्याच्या काळात पृथ्वीवर मोठे बदल होतात. चुंबकीय क्षेत्रात बदल होत असल्याने काही नवी बेटे तयार होतात. तर काही समुद्रात लुप्त होतात. खंड एकमेकांपासून विलग होतात किंवा एकमेकांजवळ येतात. या काळात पृथ्वीवरील काही सजीव नामशेषही होतात. मायकल आणि त्यांच्या पथकाचे हे संशोधन जिओसायन्स फ्रटियर्समध्ये प्रकाशित झाले आहे.
या संशोधनानुसार सुमारे 2.75 कोटी वर्षांनी असा प्रलय येत असल्याचे दिसून आल्याचे मायकल यांनी सांगितले. आता पृथ्वीवर सुमारे 2 कोटी वर्षांनी असा महाप्रलय येईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. याआधी 1920 मध्ये झालेल्या संशोधनात 3 कोटी वर्षांनी महाप्रलय येईल असा अंदाज वर्तवण्यात आाला होता. तर 1980 ते 90 या काळात झालेल्या संशोधनात 2.62 कोटी वर्षांचा काळाने महाप्रलय येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता वर्तवण्यात आलेला काळ अधिक योग्य असल्याचे संशधकांनी सांगितले.




























































