नांदेडच्या उत्तरपूर्व भागात भूकंपाचे धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडच्या उत्तरपूर्व भागात शहरापासून ८० किलोमीटरवर काल रात्री सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेड शहरातील तरोडा भाग, श्रीनगरचा काही भाग, जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, तामसा या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टरस्केलवर या भूकंपाची नोंद ३.९ एवढी नोंदविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत कोणीही अफवा पसरु नये व घाबरुन जावू नये, असे आवाहन केले आहे.

काल सायंकाळी हदगाव, हिमायतनगर या भागात पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या. मात्र त्यामुळे उकाडा होवू लागल्याने लोक घराबाहेरच गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान जोरदार हादरे बसले. हे धक्के भूकंपाचेच असल्याने नागरिक सैरावैरा पळू लागले. घरात असलेली मंडळी बाहेर आली आणि घाबरुन पोलीस ठाणे व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन करु लागली. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावर हिमायतनगर, उमरखेड, किनवट, ढाणकी, माहूर, महागाव, मांडावी, कोल्हारी, इस्लापूर, आदी भागात हे धक्के जाणवले. काही घराची छते देखील यामुळे कोसळली असून, टिनपत्रे देखील उडून पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. माहूर शहराला देखील भूकंपाचा जोरदार धक्का बसला. माहूरच्या काही घरावरील टिनपत्रे उडून पडली. हदगाव तालुक्यातील शहर व परिसरातील वाकोडा, रुई, धानोरा, दगडीवाडी, तामसा या भागातील नागरिकांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या खगोलशास्त्र व भूकंप संशोधन केंद्रावर या भूकंपाची नोंद ३.९ रिश्टरस्केल एवढी झाली आहे.

दरम्यान नांदेड शहरातही काल रात्री सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान तरोडा, वर्कशॉप, श्रीनगर, मोरचौक, छत्रपती चौक या भागात भूकंपाचा हलका धक्का जाणवला.

दरम्यान, हिंगोली लोकसभेचे शिवसेना खासदार ज्यांच्या कार्यक्षेत्रात हा सर्व भाग येतो. त्यांनी काल रात्रभर किनवट, शिवनी, ईस्लापूरसह सकाळी माहूरगड व परिसरात पाहणी करून जनतेला दिलासा दिला.तसेच उमरखेड, महागाव तालुक्यातील गावांना देखील त्यांनी भेटी दिल्या. घाबरुन गेलेल्या नागरिकांना त्यांनी दिलासा दिल्याने नागरिकांना हायसे वाटले. नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, जनतेच्या मदतीसाठी मी सदैव आपल्या सोबत आहे आणि रात्रभर जागा आहे, असे भावनास्पद आवाहन त्यांनी केले आहे.

त्यांनी किनवट परिसरात पाहणी केली असून,भूकंपाने भयभित झालेल्या व घराबाहेर पडलेल्या मंडळींना दिलासा दिला आहे. जनतेच्या मनातील भीती दूर करण्यासाठी स्वतः फिरुन दिलासा दिला. तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, शहरप्रमुख सुरज सातुरवार, प्रशांत कोरडे व तहसील कार्यालयातील कर्मचारी हजर होते.भूकंपामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुन पंचनामे करावेत आणि त्यांना मदत द्यावी, अशी मागणीही खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.