
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव या पाचही तालुक्यांमध्ये शनिवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे या भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक भागांतील नागरिक घराबाहेर पडले. हिंगोलीसह नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले.
हिंगोली जिल्ह्यात मागील ८ वर्षांपासून अधूनमधून भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरूच आहे. जिल्ह्यातील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये यापूर्वीही भूकंपाचे केंद्रबिंदू आढळले आहेत. दरम्यान, शनिवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ मिनिटांनी हिंगोली शहरासह कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत आणि सेनगाव या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद ४.७ इतकी झाली आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हेच या भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्क्यामुळे जिल्ह्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच नागरिकांनी घाबरू नये व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
नांदेड, परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के
हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्येही सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. मागील काही वर्षांपासून हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत सातत्याने भूकंपाची मालिका सुरू आहे.
सेनगावात पहिल्यांदाच धक्का
हिंगोली शहरासह कळमनुरी, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यांमध्ये यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, सेनगाव तालुक्यात पहिल्यांदाच भूकंपाचा धक्का जाणवल्याने त्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



























































