पर्यावरणपूरक बाप्पा!

स्वतःच्या हाताने बाप्पा साकारणेकिती सुंदर कल्पकताछोटीशी शाडूची मूर्ती आपल्या हाताने तयार करून त्याची पूजा करणे ही खऱया अर्थाने गणेशपूजा. पर्यावरणाची कोणतीही हानी न होता बाप्पाचा उत्सव असाही साजरा होऊ शकतोआपणही प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे

तयार केलेल्या मूर्तीची पूजा करणार

manasi-kulkarni

मी अकरावीची एस. पी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मला शाडूची मूर्ती बनविण्याची उत्सुकता होती. पहिलाच प्रयत्न म्हणून शाडूची मूर्ती तयार केली आणि ती घरच्यांना आवडलीदेखील. यापुढे दरवर्षी मूर्ती तयार करण्याचा विचार आहे. शाडूच्या मातीपासून ही मूर्ती तयार केली असून दीड तासात ती पूर्ण केली. आई-बाबांना माझी मूर्ती प्रचंड आवडली आहे. ही मूर्ती घरीच बसवणार आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या आईने तशी मूर्ती बनवली होती त्यांचे पाहून मी बनवायला शिकले. मूर्ती करताना त्यात तल्लीन व्हायला हवे. कारण आपण जे अनुभवतो तेच मूर्तीत दिसते. या मूर्तीवर अजून रंगकाम केलेलं नाही, कारण मूर्ती वाळायला वेळ लागते. मूर्तीचे खास आकर्षण डोळे असतात त्यामुळे ते काढणे आव्हानात्मक असते. त्यामुळे चूक होऊ नये म्हणून आधी कागदावर डोळे रेखाटते आणि मग मूर्तीवर रेखाटण्याचा प्रयत्न करते.

मानसी कुलकर्णी, पुणे

यूटय़ुबच्या मदतीने मूर्ती साकारली

sahil

लहानपणापासून बाप्पा माझा आवडीचा आहे. पण त्याची मूर्ती साकारण्याची माझी मनापासून इच्छा होती. त्यासाठी यूटय़ुबची मला फार मदत झाली. त्यावर बघत बघत मी यंदा मूर्ती साकरली आहे. मूर्तीसाठी एका दादाकडून मी शाडूची माती मागवली आणि मूर्ती घरीच बनविण्याचा छोटा प्रयत्न केला. माझी हौस, माझी आवड म्हणून ही मूर्ती मी तयार केली आहे. या मूर्तीला रंग देण्यासाठी माझ्याकडे सामग्री नाही कारण मी केवळ आवड म्हणून मूर्ती साकारल्या. त्यामुळे रंग देण्याचा विचार केलेला नाही. पण मूर्ती माझ्या हाताने घडवायची त्याला आकार द्यायचा ही हौस भागली आहे आणि सुंदर मूर्ती साकारली. सध्या मी बारावीला आहे. पुढे जाऊन मला जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्ला शिकून भविष्यात चांगला फाईन आर्टस् करायचे आहे. कुठल्याही कार्यशाळेत कधी गेलो नाही, पण मूर्तीशाळांना भेट दिली आहे. तिथे जाऊन त्या मूर्तिकारांच्या कलेचे निरीक्षण करणे ते काय करतात, कसे करतात याकडे लक्ष देतो. ही मूर्ती साधारण एक दीड फुटाची आहे. ती घडवायला साधारण दोन ते तीन दिवस लागले. माझ्या घरी गणपती बसतो त्यामुळे हिच मूर्ती बनवून ती घरी ठेवण्याचा दादाने सल्ला दिला, पण अजून मी परफेक्ट नाही. ज्यावेळी तो परफेक्टपणा येईल त्यावेळी नक्की ठेवेन. किमान पुढच्या वर्षी तसा प्रयत्न असेल.

साहिल नांदगावकर, चारकोप कांदिवली

चौदाव्या वर्षापासून मूर्ती घडवतो

vikrant-salaskar

मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतो. त्यासोबत सामाजिक संदेशही देत असतो. लोकांना कागदाच्या मूर्तींची भीती वाटते त्याला चांगले फिनीशिंग येणार नाही असा समज असतो. पण त्यांचा हा समज मी चुकीचा ठरवला. कागदाची मूर्तीही सुबक आणि आकर्षक बनते. शाळेत असताना आई बाबा मला पॉकिट मनी द्यायचे. ते पैसे वाचवून मित्रांच्या मदतीने घरी मूर्ती तयार करायला सुरुवात केली. तारेच्या स्ट्रक्चरवर बांबूच्या मदतीने आकार बनवून घेतला. जेव्हा स्ट्रक्चर बनवले तेव्हा 8 फुटांची मूर्ती घरात बनवली. शाळेत जायचो आणि शाळेतून घरी आल्यावर मूर्तीचे काम करायचो.  आमच्या भागातले आमदार घरी गणपती पहायला आले. त्यांनाही आवडले. नंतर आम्ही मंडळ स्थापन करून तिथे 37 फुटाची पहिली मूर्ती झाली तेव्हा मी चौदा वर्षांचा होतो. सगळ्या मित्रांनी मदत केली होती. टाकाऊपासून टिकावू असा त्यातून संदेश देतो. तिथून प्रवास सुरु झाला तो आजही सुरू आहे. यावेळी दीडशे मूर्ती डिझाईन केल्या आहेत.  गेल्यावर्षी वाळलेल्या पानांची मूर्ती तयार केली होती.

विक्रांत साळसकर, सायन चुनाभट्टी