
महाराष्ट्रापाठोपाठ भाजपने झारखंडमधलीही सत्ता गमावली. या दोन राज्यांप्रमाणेच भाजपचा दिल्लीतही पराभव होईल असं भाकीत भाजपच्याच खासदाराने वर्तवले आहे. देशापुढे आर्थिक मंदीचे प्रचंड मोठे संकट निर्माण झाले असून या संकटामुळे भाजपला त्रास सहन करावा लागणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. आर्थिक संकटामुळे अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासंदर्भात आलेला निर्णयही झाकोळून जाणार असून या निर्णयाचा भाजपला लाभ होणार नाही असेही या खासदाराने म्हटले आहे.
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या सडेतोड आणि स्पष्ट भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. भाजपमध्ये असूनही ते खरे बोलायला कचरत नाहीत. त्यांनी हफिंगटन पोस्टला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले आहे की देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे, अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात भाजपला मिळालेलं यश झाकोळून जाणार आहे. स्वामी म्हणाले की ‘राम मंदिराच्या मुद्दासंदर्भात आम्ही प्रचंड गंभीर आहोत, मात्र सध्याची वेळ ही रस्त्यावर उतरून मिठाई वाटण्याची नाहीये. सध्या देशाची अर्थव्यवस्था ही महत्वाची गोष्ट आहे. आपण उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत. आता एखादा चमत्कारच आम्हाला यापासून वाचवू शकतो.’
आपण मुलांच्या शाळेची फी भरू शकतो की नाही किंवा आपली बँक आर्थिक संकटामुळे बुडू शकते अशा असंख्य शंका सामान्य नागरिकांना सतावत आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत बोलत असताना स्वामी यांनी त्यांचा रोख दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे वळवला. स्वामी यांनी इशारा दिला आहे की देशाच्या आर्थिक परिस्थितीमुळे दिल्लीतील निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकतो. बेरोजगारीचे संकट इथके मोठे आहे की या मुद्दापुढे राम मंदिराचा मुद्दा फिका पडेल. स्वामी यांनी मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ‘मोदी कोणाचंच ऐकत नाही, ते त्यांचंच ऐकतात जे खरी परिस्थिती सांगत नाहीत.’
स्वामी म्हणाले की देशाच्या राजधानीसंदर्भात रणनिती आखण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. चांगला उमेदवार मुख्यमंत्री म्हणून पुढे केला तर आम्ही जिंकू शकतो. सध्याचे आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांचं नाव घेत स्वामी म्हणाले की त्यांना जर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले तर आम्ही दिल्लीमध्ये जिंकू शकतो.
























































