
>> विनायक कुळकर्णी
जेव्हा आपण पैशाचा किंवा आर्थिक स्थैर्याचा विचार करतो तेव्हा आपण पुढील पाच, दहा किंवा पंधरा वर्षांचा वेध घेऊ शकतो? किमान पुढील दहा वर्षांचा सविस्तर आराखडा आर्थिक नियोजनासाठी आखू शकतोय का? आपण इतर लोकांशी आर्थिक स्तरावर कितपत स्वतःशी तुलना करतोय? आपण आपले आर्थिक भवितव्य कितपत घडवू शकतोय? या आर्थिक भवितव्यावर बाह्य घटक कितपत परिणामकारी ठरू शकतात? या किमान चार प्रश्नांची उत्तरे आपण नीट मांडू शकलो तरच आपल्या आर्थिक आरोग्याचा आलेख उत्तमपणे रेखाटता येणार आहे.
पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 अन्वये निर्बंध लागू केल्यामुळे खातेदार-ठेवीदार हवालदिल झाल्याचे दिसले. एकाच महिन्यात याच कायद्याच्या कलमान्वये याआधी धाराशीवस्थित वसंतदादा नागरी सहकारी बँक, नाशिकस्थित विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी बँक आणि कराड जनता सहकारी बँक या चार सहकारी बँकांवर निर्बंध घातले गेले आहेत. त्याआधी गेल्या वर्षी मुंबईतील सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेवर निर्बंध घालून बँकेचे सर्व व्यवहार बंद केलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाने केवळ अर्धा-एक टक्का व्याज जास्त मिळते यो लोभाने ‘रिस्क’ घ्यायची का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अचानक पैशाची निकड लागली तर म्हणून बँक या साधनाकडे नेहमीच बघत असतो. परंतु दुर्दैवाने आपण हे साधन आपल्या संपूर्ण गुंतवणुकीचे केंद्र मानून मुदत ठेव, आवर्ती जमा खाते आदी माध्यमांतून आपली सर्व पुंजी ठेवत जातो. त्यासाठी आकर्षक असणारे व्याजदराचे टक्के मनाला भुरळ घालतात. बँकेचे महत्त्व आपल्या जीवनात फक्त व्यवहारांचे एक माध्यम म्हणूनच असले पाहिजे. आज बहुसंख्य बँका बँकिंगपेक्षा विमा पॉलिसीज आणि म्युच्युअल फंडांच्या योजना ग्राहकांना विकण्यात अधिक बिझी झाल्या आहेत. जेव्हा बँक कर्मचारी त्यांना दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी खातेदारांना बळीचा बकरा बनवतात, कालांतराने त्या योजनात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरही ग्राहक काहीच करू शकत नाही. कारण ज्याने ही योजना त्याच्या गळ्यात मारलेली असते त्या कर्मचाऱयाची कुठेतरी बदली झालेली असते. काही वर्षांपूर्वी काही सहकारी बँकांनी सबॉर्डिनेटेड फिक्स्ड डिपॉझिट नावाने मुदत ठेवी स्वीकारल्या आहेत. या ठेवींवर सर्वात अधिक व्याजदर देऊ केला होता. परंतु त्या मुदत ठेवी मध्येच मोडता येणार नाहीत, तसेच त्यावर कर्जसुद्धा उपलब्ध केले जाणार नाही, एवढेच नव्हे तर या मुदत ठेवी अनुषंगिक तारण म्हणून ठेवता येणार नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठेवींना ठेवी पत हमी महामंडळाचे विमा संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट म्हटलेले आहे. या सर्व अटी त्या मुदत ठेव प्रमाणपत्राच्या मागील बाजूस छापलेल्या आहेत. तरीही लोकांनी या मुदत ठेवींत लाखो रुपयांच्या ठेवी दीर्घ मुदतीसाठी ठेवल्या. त्यासाठी आवश्यक असणारे घोषणापत्र स्वतः सही करून दिले आहे. त्यामुळे बँकांना दोष मिळणार याची खबरदारी बँकांकडून घेतली गेली. आपल्या आर्थिक आरोग्याशी पहिला खेळ हा आपल्या बँक व्यवहारातूनच सुरू होत असतो. आपल्या आर्थिक निरक्षरतेचा गैरफायदा असा उठवला जात असतो.
जेव्हा आपण पैशाचा किंवा आर्थिक स्थैर्याचा विचार करतो तेव्हा आपण पुढील पाच, दहा किंवा पंधरा वर्षांचा वेध घेऊ शकतो? किमान पुढील दहा वर्षांचा सविस्तर आराखडा आर्थिक नियोजनासाठी आखू शकतोय का? आपण इतर लोकांशी आर्थिक स्तरावर कितपत स्वतःशी तुलना करतोय? आपण आपले आर्थिक भवितव्य कितपत घडवू शकतोय? या आर्थिक भवितव्यावर बाह्य घटक कितपत परिणामकारी ठरू शकतात? या किमान चार प्रश्नांची उत्तरे आपण नीट मांडू शकलो तरच आपल्या आर्थिक आरोग्याचा आलेख उत्तमपणे रेखाटता येणार आहे. मुळात आर्थिक व्यवहारात हृदयाला न गोवता मेंदूचा अधिकाधिक वापर अपेक्षित असतो, पण इथेच मराठी माणसाची अधिक गल्लत होते. लाभ आणि लोभ यात एका मात्रेचा फरक असतो. हा फरक लक्षात न घेता शेरेगर, केबीसी, सी यू मार्केटिंग, गोल्डन चेन, ट्विंकल, सिट्रस इन आदींची आपणच भर केली आहे.
आपण पैशाचा किंवा आर्थिक स्थैर्याचा विचार करतो तेव्हा आपण पुढील पाच, दहा किंवा पंधरा वर्षांचा वेध घेऊ शकतो? या प्रश्नाचा विचार करण्यासाठी केवळ मुलांचे शिक्षण, उच्च शिक्षण, मुलीचे लग्न एवढेच कशाला ज्या ज्या वेळी निवृत्ती पश्चात काळासाठी तरतूद करण्यासाठी कोणी सुचवले तर आपण सहजपणे बोलून जातो की अजून निवृत्तीला वीस-पंचवीस वर्षे बाकी आहेत. त्याचा आता कशाला विचार करायला हवा? ज्या वेळी निवृत्ती दारात उभी असते त्या वेळी गेलेली वीस-पंचवीस वर्षे आपण कसे झोपलो होतो ते दर्शवित असतात. परंतु आता खूपच उशीर झालेला असतो. मिळणारी प्रॉव्हिडंट फंडाची आणि इतर सेवानिवृत्ती लाभाची एकत्रित रक्कम लक्षात घेता महिन्याचा अपेक्षित खर्च कसा भागणार याची चिंता मेंदू कुरतडायला लागते. पेन्शनही उपलब्ध नसेल तर सेवानिवृत्ती पश्चात होणारी आर्थिक कुतरओढ असह्य ठरून शारीरिक आणि मानसिक आरोग्यही धोक्यात आणते.
आपण इतर लोकांशी आर्थिक स्तरावर कितपत स्वतःशी तुलना करतोय? जर आपल्यापेक्षा राहणीमान अधिक असलेल्या खरं तर अधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तींशी आपण तुलना करताना त्यांच्यासारखे खर्च करू इच्छितोय की ते जी बचत करतात ती साधने ती आपण स्वीकारतोय… प्रसंगी त्यांच्यासारखेच कर्ज काढून मोठेपणा दाखवतोय… थोडक्यात त्यांच्या चांगल्या सवयी आपण अंगीकारतोय की खोटय़ा प्रतिष्ठsच्या मुखवटय़ाखाली वावरतोय हे जेव्हा स्वतःला समजू लागेल त्याचवेळी आपल्या आर्थिक आरोग्याचा पाया रचला जाणार आहे. यातूनच आर्थिक स्थैर्यासह आनंद, शांतता, समाधान आणि अभिमान मिळून राग, असहाय्यपण, दुःख आणि भीती यावर नियंत्रण मिळणार असते.
आपण आपले आर्थिक भवितव्य कितपत घडवू शकत आहोत, या प्रश्नातच भविष्याचा वेध अपेक्षित आहे. जी स्वप्ने बघतोय ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले प्रयत्न कितपत योग्य आहेत आणि ठरविलेले उद्दिष्ट निर्देशित वेळेत पूर्ण होणार आहे का, असे अनेक प्रश्न या भवितव्याच्या मुद्दय़ावर उपस्थित होत असतात. त्यासाठी वर्तमानातील जमा-खर्चाचा ताळेबंद जुळवताना चार पैसे बाजूला पडलेच पाहिजेच हा निश्चय आवश्यक असतो. बाजूला काढलेली बचत योग्य त्या साधनात म्युच्युअल फंडस्, शेअर्स, स्थावर मालमत्ता आदी नियमित गुंतवली जाणे, त्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेऊन योग्य ते बदल करणे, त्यात्या उद्दिष्टांसाठी अपेक्षित असलेला निधी त्यात्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूरक ठरणारा असेल याची कालसापेक्ष खातरजमा करणे. या आर्थिक भवितव्यावर बाह्य घटक कितपत परिणामकारी ठरू शकतात? आपले उत्पन्न, वय, शिक्षण, आर्थिक साक्षरता हे घटक जितके परिणामकारी आहेत तेवढेच समाजात ज्यांना आपण आदर्श मानतोय आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतोय त्यांचीच पावले योग्य पडत असतील तरच ठीकच आहे. ज्याच्याशी तुलना करतोय त्याचा स्वभाव आणि कृतीची नक्कल आपल्याकडून होत नाहीये याची खात्री करून घेणे, व्यसनाधीनता, अनावश्यक हॉटेलिंग, मित्रमैत्रिणींचे दबावकारी कृत्य, महागडय़ा खरेदीचे स्तोम असे अनेक बाह्य घटक आपले आर्थिक भवितव्य पणाला लावू शकतात. इथेच आपले आर्थिक आरोग्य बिघडू लागते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य योग-व्यायामामुळे, ध्यान धारणेमुळे जसे चांगले राखता येते तसेच आपले आर्थिक आरोग्यसुद्धा संयम, गुंतवणूक साधनांचा नेमका अभ्यास आणि सातत्य राखून केली जाणारी बचत या तीन घटकांमुळे ठणठणीत ठेवता येऊ शकते.
(लेखक गुंतवणूक समुपदेशक आणि आर्थिक लेखक आहेत)





























































