दादा भुसेंचा भाचेजावई अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक, वसई-विरारमधील 41 बेकायदा बांधकामांप्रकरणी ईडीची कारवाई

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त आणि दादा भुसे यांचे भाचे जावई अनिलकुमार पवार, तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्यासह एकूण चार जणांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज अटक केली. वसईतील डंपिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या भूखंडावर 41 बेकायदा इमारत प्रकरणात ईडीने सखोल चौकशी करून ही कारवाई केली. पवार आणि रेड्डी यांनी बेकायदा बांधकामे मंजूर करण्यासाठी प्रत्येक फुटामागे 25 रुपयांचा रेट लावल्याचे ईडी तपासात उघड झाले. अटक केलेल्यांमध्ये पवार आणि रेड्डींसह माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांचा समावेश आहे. या चौघांनाही उद्या गुरुवारी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ईडीच्या या कारवाईमुळे मिंधे गटाला मोठा हादरा बसला आहे.

वसई-विरार पालिकेच्या आयुक्तपदी असताना अनिलकुमार पवार यांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराने कळस गाठला होता. नालासोपारा येथील 60 एकर क्षेत्रफळावरील भूखंडाचे आरक्षण उठवून पवार यांच्या आशीर्वादाने 41 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. या भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा डेपोचे आरक्षण होते. त्याशिवाय शहरात नव्याने उभ्या राहणाऱया प्रत्येक टॉवर व इमारतीसाठी महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना हाताशी धरून पवार यांनी बेकायदा बांधकामांचे रेट कार्डच जारी केले होते. त्यात पवार यांना प्रति चौरसफूट 25 रुपये तर रेड्डी यांना प्रती चौरसफूट 10 रुपये असा रेट ठरला होता. ईडीने आधी रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापेमारी केली आणि तब्बल 31 कोटींचे घबाड जप्त केले. त्यानंतर अनिलकुमार यांच्या काळय़ा कारभाराचा पर्दाफाश झाला.

संशयास्पद कागदपत्रे व रोकड जप्त

अनिलकुमार पवार यांची बदली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण ठाणे येथे झाल्यानंतर त्यांनी वसईच्या आयुक्तपदाचा पदभार सोडला. त्याच्या दुसऱया दिवशीच ईडीने पवार यांच्यावर छापेमारी केली. त्यांचे वसईतील निवासस्थान, नाशिक व सटाणा येथील स्थावर मालमत्ता यासह 12 ठिकाणी धाडी घातल्या. नाशिक येथील त्यांच्या पुतण्याकडून 1 कोटी 33 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. या धाडींमध्ये ईडीने अत्यंत महत्त्वाची संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर अनिलकुमार पवार व त्यांच्या पत्नीची वरळीच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

अखेर फास आवळला

ईडीने पवार यांच्याभोवती आज अखेर आपला फास आवळला. अनिलकुमार पवार आणि त्यांच्या भ्रष्ट कारभारात सामील असणारे वसई-विरार महापालिकेचे माजी नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता अशा चौघांना अटक केली.