राजधानी दिल्लीत ED ची मोठी कारवाई; 100 कोटींच्या परदेशी फंडींग प्रकरणात चौकशी

देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतीच दिल्लीतून ईडीच्या कारवाईबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या खानपुर भागात परदेशी निधी आणि इतर अनेक प्रकरणांबाबत सध्या चौकशीसत्र सुरू असून शुक्रवारी या भागांमध्ये ईडीकडून छापेमारी केली जात आहे. 15 ठिकाणी केलेल्या छापेमारीमधून तब्बल 1 करोडपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. यावेळी या ठिकाणांवरुन अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच डिमॅट खात्यात असलेले 2.5 कोटी रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार म्हणण्यानुसार, खानपूरमध्ये एक बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कॉलसेंटरमधून अमेरिकेसारख्या देशांमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांना लक्ष्य केले जात होते. लोकांची फसवणूक करणारे हे लोक अनेक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये म्हणजेच मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि इतर ठिकाणचे प्रतिनिधी असल्याचे सांगून लोकांना बनावट किंवा पायरेटेड सॉफ्टवेअर विकत असल्याचे आता उघड झाले आहे.

दरम्यान ही माहिती उघड होताच, ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा ही छापेमारी सुरु केली आहे. अजून तीन ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. आतापर्यंत केलेल्या या तपासात 2016 – 17 पासून 2024- 25 पर्यंत तब्बल 100 कोटी रुपयांचा परदेशी निधी या खात्यांमध्ये जमा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

दरम्यान या फसवणुकीमध्ये एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. ईडीच्या छाप्यात बनावट कॉल सेंटर चालवण्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचेही ईडीने स्पष्ट केले आहे.