लाचखोर ईडी सहाय्यक संचालक संदीप सिंगचे कारनामे आता समोर येत आहेत. लाचेची 20 लाख रुपयांची रक्कम थेट हवालाने पाठवण्याची ताकीद सिंगने ज्वेलर्सला दिली होती. एवढय़ा मोठय़ा रकमेचा व्यवहार 20 रुपयांच्या नोटेच्या साक्षीने होणार होता.
मुंबईतील ज्वेलर्सकडून लाच मागितल्याने सिंगला सीबीआयने अटक केली. सीबीआय चौकशीतून ईडी अधिकाऱ्याच्या लाचेचे प्रताप समोर येत आहेत. छापा टाकल्यानंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी सिंगने ज्वलर्सकडे 20 लाखांची लाच मागितली.
लाचेची रक्कम मुंबईत स्वीकारण्याऐवजी दिल्ली पाठव, असे सिंगने ज्वेलर्सला सांगितले. एवढी मोठी रक्कम दिल्ली पाठवणे ज्वेलर्सला शक्य नव्हते. त्यामुळे ही रक्कम हवालामार्फत पाठव, असे सिंगने ज्वेलर्सला सांगितले, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
सेवेतून निलंबित
ज्वेलर्सने तक्रार केल्यानंतर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सिंगला अटक केली. त्यानंतर ईडीनेही याप्रकरणी गुन्हा नोंदवून सिंगला सेवेतून निलंबित केले.
एकाच क्रमांकाची नोट
हवालाचा व्यवहार एकाच क्रमांकाच्या नोटेने होतो. पैसे देणारा आणि घेणारा अशा दोघांकडे एकाच क्रमांकाची नोट असते. नोटेवरचा नंबर जुळला की पैसे दिले जातात. सिंगच्या लाचेसाठी 20 रुपयांच्या नोटेचा वापर होणार होता. या व्यवहारासाठी सिंगने विशिष्ट मोबाईल क्रमांकही ज्वलर्सला दिला होता.