
तब्बल 425 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली आणि पुण्यात 10 ठिकाणी छापेमारी केली. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने पंजाब नॅशनल बँकेने (आधीची ई-ओबीसी) केलेल्या तक्रारीनंतर ही छापेमारी केली.
दिल्लीत 9 आणि पुण्यात एका ठिकाणी ईडीने छापेमारी केली. जीईआयपीएल अर्थात मेसर्स गुप्ता एग्झिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि संचालकांवर 425 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कर्जाचा हा निधी कंपनीने विविध संस्थांमध्ये वळता केला. या संस्था जीईआयपीएल कंपनीशी कुठल्याही प्रकारे निगडित नव्हत्या. तसेच कर्जाचा निधी कुठल्याही वैध कामांसाठीही वापरण्यात आला नाही. हा निधी कथितरीत्या कंपनीच्या संचालकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्ती किंवा नातेवाईकांशी संबंधित ठिकाणी वळता केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली.