दादा भुसेंचे जावई, मिंध्यांच्या वरदहस्ताने प्रमोशन; पालिका आयुक्तपदाचा चार्ज सोडताच अनिलकुमार पवारांवर ईडीची धाड

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांना काल निरोप देण्यात आला आणि आज सकाळीच त्यांच्यावर ईडीची धाड पडली. डंपिंग ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या 41 बेकायदा इमारतींप्रकरणी अनिलकुमार पवार यांच्या वसईतील घरावर ईडीने छापा टाकला. वसई-विरारसह मुंबई, नाशिक, पुण्यातील 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून या झडतीमध्ये मोठे घबाड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दिवसभर हे धाडसत्र सुरू होते. ईडीच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

वसई-विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सोमवारी आपल्या पदाची सूत्रे मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केली. पवार यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली असून त्यास काही तास उलटत नाही तोच आज सकाळी ईडीने छापासत्र सुरू केले. अनिलकुमार पवार यांच्या दीनदयाळ नगरमधील निवासस्थानी सात वाजता ईडीचे पथक धडकले आणि त्यांनी बराच वेळ सर्च ऑपरेशन केले.

वसईच्या डंपिंग ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या 41 बेकायदा इमारतींच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या बांधकामांची दखल न्यायालयानेदेखील घेतली होती. महापालिकेचे तत्कालीन अधिकारी वाय.एस. रेड्डी यांच्या घरावर यापूर्वी छापा टाकण्यात आला होता. तसेच वसई-विरारमधील बिल्डर आणि आर्किटेक्ट यांनाही टार्गेट केले होते. आज ईडीच्या अधिकाऱयांनी अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानामधील काही कागदपत्रांची तपासणी केली असून त्याचा अधिक तपशील मिळू शकला नाही. यापूर्वी ईडीने बारा ठिकाणी छापे टाकून नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. आजच्या कारवाईमुळे महापालिकेतील अधिकारी हादरले आहेत.

17 फेब्रुवारी 2025 ते 6 मार्चपर्यंत मीरा-भाईंदर महापालिकेचा अतिरिक्त कार्यभारही पवार यांच्याकडेच होता. या काळात त्यांनी अनेक बांधकाम परवानग्या व भोगवटा प्रमाणपत्रे व टीडीआर प्रमाणपत्रे दिल्याची चर्चा आहे.

शेवटच्या दिवशी अनेक फाइल्स मंजूर?

पवार यांनी अवैध आणि बेहिशेबी माया जमवली. 200 ते 250 इमारतींना त्यांनी ऑफलाईन सीसी दिल्या. बदली झाल्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी अनेक फाइल्स मंजूर केल्याचा आरोप आहे, असे एनडीटीव्ही मराठी या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाच्या वृत्तात म्हटले आहे. नाशिक जिल्हा आणि पुण्यातील कोटय़वधींची जाहीर मालमत्ता, भूखंड, फार्महाऊस यांचा तपशीलही या वृत्तात देण्यात आला आहे.

आयएएस नसताना मिंध्यांनी केले आयुक्त

अनिल पवार हे शहासेनेचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई असून आयएएस होण्याआधीच भुसे यांच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आयुक्तपदी बढती दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. पवार हे आधी ठाण्यात अपर जिल्हाधिकारी पदावर होते. तिथून त्यांची नाशिकला बदली झाली. तिथून ते पुन्हा ठाण्यात मुद्रांक शुल्क विभागात आले. त्यानंतर 13 जानेवारी 2022 रोजी त्यांची थेट वसई विरार महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, 29 जून 2023 रोजी पवार आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना वसईतच आयुक्त म्हणून कायम ठेवण्यात आले.