
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चार प्रसिद्ध अभिनेत्यांना समन्स बजावले आहे. यामध्ये प्रकाश राज, राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा आणि मंचू लक्ष्मी यांचा समावेश आहे. या अभिनेत्यांनी कथितपणे अवैध सट्टेबाजी अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न निर्माण झाले.
ईडीने राणा दग्गुबाती याला 23 जुलै रोजी हैदराबादमधील त्यांच्या प्रादेशिक कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. प्रकाश राज यांना 30 जुलै, विजय देवरकोंडा याला 6 ऑगस्ट आणि मंचू लक्ष्मी यांना 13 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चारही अभिनेत्यांनी जंगली रमी, A23, Yolo 247, JeetWin, Parimatch, Lotus365 यांसारख्या सट्टेबाजी अॅप्सचा प्रचार केल्याचा संशय आहे.
या प्रकरणात ईडीने पंजागुट्टा, मियापूर, सायबराबाद, सूर्यपेट आणि विशाखापट्टणम येथे दाखल झालेल्या पाच राज्य पोलिसांच्या एफआयआरची दखल घेतली आहे. या तक्रारींनुसार, 29 अभिनेते, प्रभावशाली व्यक्ती आणि यूट्यूबर्सवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत (PMLA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये निधी अग्रवाल, प्रणीता सुभाष, अनन्या नागल्ला, श्रीमुखी, श्यामला, हर्ष साय आणि बय्या सनी यादव यांसारख्या इतर सेलिब्रिटींचाही समावेश आहे.