
नीलेश कुलकर्णी
या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. केंद्रातील मोदी सरकारचे कदाचित हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असेल. याचा अर्थ या सरकारचे चार पावसाळे सरले आहेत. साहजिकच या अधिवेशनात सरकारचा चार पावसाळ्यांचा हिसाब किताब मांडण्यास विरोधक उत्सुक असतील. त्याचवेळी सरकार मात्र हे सर्व होणार नाही याची काळजी घेईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे गोंधळाचा सहारा घेतला जातो काय हे अधिवेशन काळात दिसेलच. अर्थात मोदी सरकारचे चार पावसाळे संपले, पुढे काय हा प्रश्न कायमच राहणार आहे.
या आठवड्यात मोदी सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाला एक प्रकारचे महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थात या अधिवेशनातून काय हशील होणार, हा तसा प्रश्नच आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राजस्थान, छत्तीसगढ व मध्य प्रदेश या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या तिन्ही राज्यांत सत्ता कायम ठेवून लोकसभेपूर्वी देशात ‘फिल गुड’ची भावना निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तर भाजप आणि विशेषतः मोदी सरकारच्या सुमार कामगिरीमुळे या तिन्ही राज्यांत पुन्हा काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील, असा काँग्रेसींना भरवसा आहे. त्यात तिन्ही राज्यांत ‘ऍण्टी इन्कमबन्सी’चाही मोठा फॅक्टर आहे. दुसरीकडे स्विस बॅंकेत हिंदुस्थानातून काळा पैसा वाढल्याची बातमी मध्यंतरी आल्यामुळे मोदी सरकारचा काळ्या पैशाविरोधातील तथाकथित ‘सर्जिकल स्ट्राइक’ उताणा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधक या अधिवेशनात काळ्या पैशाच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गेल्या अधिवेशनात विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव अजून धूळ खात पडला आहे. त्यामुळे त्याचे काय होते हेदेखील पहावे लागेल. त्यावर चर्चा होऊ नये असाच सरकारचा प्रयत्न राहील. विरोधक मात्र त्यानिमित्ताने चर्चा घडवून मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्याची संधी साधतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जेमतेम काही महिने राहिले असताना देशभरात सरकारविषयी ‘मेसेज’ जाईल. सरकारला हे नको असल्याने याही अधिवेशनात गोंधळाचा सहारा घेतला जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणूक ‘फेडरल फ्रंट’च्या बॅनरखाली लढण्याच्या आणाभाका तमाम सेक्युलरांनी बंगळुरूत घेतल्या असल्या तरी त्यांच्या एकीचे काय होते, हेही या अधिवेशनात दिसून येईल. अन्यथा संसदेचे पावसाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे आले आणि गेले असेच होईल. दुसरीकडे केंद्र सरकारचे ‘चार पावसाळे’ आता सरले असले तरी देशावर अद्याप ‘अच्छे दिन’ची बरसात झालेली नाही. पाचवा पावसाळा तरी त्या दृष्टीने फलदायी ठरतो का, ते पहायचे.























































