
शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे वाकोला विभागातील पश्चिम द्रुतगती मार्ग ते वाकोला जंक्शनपर्यंतच्या रखडलेल्या स्कायवॉकचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हा स्कायवॉक गुरुवारपासून रहदारीसाठी खुला करण्यात आला असून नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. चार किमीच्या या स्कायवॉकमुळे पादचाऱ्यांना वाकोला पाईपलाईन ते सांताक्रुझ पश्चिम एस. व्ही. रोडपर्यंत ट्रफिकच्या कटकटीशिवाय पोहोचणे शक्य होणार आहे.
कलिना आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील या स्कायवॉकचे काम रखडले होते. वाकोला नाला आणि पाईपलाईन येथे तांत्रिक कारणास्तव या स्कायवॉकचे काम पूर्ण करण्यास अडचणी येत होत्या. हा स्कायवॉक पूर्ण व्हावा यासाठी शिवसेनेचे वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाई आणि कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे पूर्वीच्या आराखडय़ात काही बदल करून एक पिलर वाढवण्यात आला. अखेर पूर्ण झालेल्या या स्कायवॉकचे उद्घाटन संजय पोतनीस आणि वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने बसवणार
वाकोल्यातील या स्कायवॉकवर पायऱ्या चढून जाणे वयस्कर आणि लहान मुलांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे या स्कायवॉकवर लवकरात लवकर सरकते जिने बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले.