आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याची घटना आसाममध्ये घडली. दिमा हासाओ येथील दिबालॉँग स्टेशनवर हा अपघात घडला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले. अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या दुर्लक्षामुळे सातत्याने रेल्वेचे अपघात होत असून या प्रकरणी आता विरोधकांकडूनही जोरदार टीका होत आहे.
अपघाताच्या घटनेनंतर तत्काळ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय ट्रेन अधिकाऱयांसह बचावासाठी दाखल झाली. लुमडिंग-बदरपूर सिंगल लाईन हिल सेक्शनवरील गाडय़ांचे संचालन स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून अधिक माहिती किंवा मदत मिळवण्यासाठी रेल्वेने 03674263120 आणि 03674263126 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ात शुक्रवारी तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावरही मोठा अपघात घडला होता. येथे दरभंगा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली होती. मालगाडीला धडक दिल्यानंतर दरभंगा एक्सप्रेसचे 12 डबे रेल्वे रुळावरून घसरले होते.