छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नारायणपूरच्या अबुझमाड येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. या परिसरात अद्याप पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढू शकतो. दुसरीकडे या अंदाधुंद गोळीबारात एसटीएफचा एक जवान शहीद, तर दोन जवान जखमी झाले आहेत.
कुतुल, फरसाबेडा, कोडामेटा भागात मोठय़ा प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचरांकडून मिळाली. या माहितीनंतर, बस्तर विभागातील जगदलपूर, दंतेवाडा, कोंडागाव आणि कांकेर येथून सुमारे 1400 डीआरजी आणि एसटीएफ जवानांना ऑपरेशनसाठी बाहेर काढण्यात आले. गेल्या 15 दिवसांपासून सैनिक नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. घनदाट जंगलात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत पोलिसांनी आतापर्यंत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
161 दिवसांत 141 नक्षलवाद्यांना ठार केले
आतापर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी वेगवेगळय़ा कारवाईत अनेक नक्षल्यांचे डाव उधळून अनेकांचा खात्मा केला. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 161 दिवसांत जवानांनी 141 नक्षलवाद्यांना ठार केले. गेल्याच आठवडय़ात दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना ठार केले होते. ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी एक डीव्हीसीएम पॅडरचा कंपनी कमांडर होता.