
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याचा इशारा आरोग्य तज्ञांकडून देण्यात आल्यामुळे पालिकेनेही आपली आरोग्य यंत्रणा तैनात ठेवण्यास सुरुवात केली आहे. तिसऱया लाटेसाठी आठ हजार बेडचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा भरल्यानंतरच नवीन जम्बो सेंटर सुरू करण्यात येतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यावर आलेली कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली आहे. दररोज 25 ते 30 हजार कोरोना चाचण्या होत असल्या तरी बाधितांचे प्रमाण केवळ 2 टक्केच आहे. असे असले तरी आगामी सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मुंबई राज्य सरकारच्या नियमानुसार अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात असली तरी तिसऱया टप्प्याचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. शिवाय तिसऱया लाटेसाठी आवश्यक बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये मालाड, महालक्ष्मी रेसकोर्स, भायखळा आणि कांजूरमार्ग येथील नव्या जम्बो सेंटरमध्ये 5500 बेड उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 80 टक्के ऑक्सिजन बेड राहणार आहेत.
सद्यस्थितीत जम्बो सेंटरची स्थिती
पालिकेच्या माध्यमातून गोरेगावमध्ये नेस्को, अंधेरी सेव्हन हिल्स, एनएससीआय वरळी आणि रिचर्डसन अँड क्रुडास हे जम्बो कोविड सेंटर सद्यस्थितीत सुरू आहेत. या ठिकाणी 10 टक्क्यांपेक्षा कमी बेडवर रुग्ण आहेत, तर बीकेसी वांद्रे, दहिसर, मुलुंड या ठिकाणी पालिकेची व्यवस्था तैनात आहे. मात्र सद्यस्थितीत रुग्णसंख्या मर्यादित असल्याने हे जम्बो कोविड सेंटर आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
60 टक्के आयसीयू, व्हेंटिलेटर रिक्त
- मुंबईत सद्यस्थितीत पालिकेकडे 2409 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. यातील 1507 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू असून 1315 आयसीयू रिक्त आहेत.
- तर 1309 व्हेंटिलेटर बेडपैकी 699 बेडवर सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून 699 व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत.
- पालिकेकडे उपलब्ध असणाऱया 9292 ऑक्सिजन बेडपैकी केवळ 1507 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू असून तब्बल 7785 ऑक्सिजन बेड रिक्त आहेत.



























































