आठ वर्षांच्या चिमुकलीची मजुरीच्या दलदलीतून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई क्राइम ब्रँचने एका आठ वर्षांच्या मुलीला मजुरीच्या दलदलीतून मुक्त केले आहे. भांडुप येथील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱया दांपत्याने त्यांच्या 18 महिन्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी झारखंडच्या त्या चिमुकलीला मुंबईत आणले होते. इतकेच नव्हे तर तिला घरकामासाठीदेखील जुंपले जात होते.

भांडुप येथील एका सोसायटीत राहणाऱया अग्रवाल दांपत्याने त्यांच्या लहान मुलाचा सांभाळ करण्याबरोबरच घरातील कामकाजांना हातभार लावण्यासाठी झारखंडवरून एका आठ वर्षांच्या मुलीला आणून ठेवले असल्याची माहिती प्रथम या एनजीओला मिळाली होती. मग ही माहिती क्राइम ब्रँचचे सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांना देण्यात आली. डुंबरे यांनी लगेच त्या मुलीची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी भांडूपमध्ये राहणाऱया चंदनशिव अग्रवाल याच्या घरावर धडक दिली त्यावेळी ती आठ वर्षांची मुलगी अग्रवाल यांच्या 18 महिन्यांच्या मुलाचा सांभाळ करत असताना सापडली. पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन तिला मानखुर्द येथील बालगृहात पाठवले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आठ वर्षांच्या मुलीला झारखंड येथून आणणारा बिझनेसमन चंदनशिव अग्रवाल (30) हा गायब असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, त्या मुलीला आणखी चार बहिणी असून त्यांचा सांभाळ आई करते. हे सर्व जण झारखंडच्या जामतारा येथील आदिवासी परिसरात राहतात. अत्यंत गरिबी असल्यामुळे मुलीला तिच्या आईने मुंबईला आणून चंदनशिवच्या ताब्यात दिले होते.

दररोज फक्त भाजी-चपाती

लांबच्या नातेवाईकांच्या ओळखीने अग्रवाल गेल्या एप्रिल महिन्यात मुलीला झारखंडमधून मुंबईत घेऊन आला होता. अग्रवाल दांपत्य दररोज केवळ चपाती आणि बटाटय़ाची भाजी हेच जेवण तिला द्यायचे. कधीतरी त्यात बदल असायचा असे त्या मुलीने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

…तेव्हा आठवडाभर डांबून ठेवले होते

काही दिवसांपूर्वी अग्रवाल दांपत्य बाहेरगावी गेले होते तेव्हा आठवडाभर त्यांनी मुलीला घरात अक्षरशः डांबून ठेवले होते, असेही त्या मुलीने सांगितल्याचे कळते.