पीटीच्या तासाला खेळताना आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, मुंबईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार

पीटीच्या तासाला खेळताना एका आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या कांदिवली भागात निर्मला इंग्लिश स्कूल मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कांदिवलीच्या आशा नगर भागात निर्मला इंग्लिश स्कूल आहे. या शाळेत शिवांश हा आठ वर्षांचा मुलगा तिसरीत शिकत होता. दुपारी पीटीचा तास सुरू होता. तेव्हा सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानात शिकत होते. तेव्हा शिवांशही या मुलांसोबत खेळत होता. शिवांश हॉपस्कॉच खेळत होता. तेव्हा पळताना शिवांश खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यामुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांनी शिवांशला श्री जी रुग्णालयात दाखले केले. शिवांशची तब्येत खालावल्याने त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शाळेच्या कर्मचाऱ्यांनी शिवांशच्या पालकांना फोन करून माहिती दिली, त्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. पण शताब्दी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यात कुठलेही काळेबेर नसल्याचे कळाले आहे. पण शिवांशला कुठलाही आजार नव्हता अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे. शिवांशवर शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.