एलियन डोनान कॅसल!

564

>> द्वारकानाथ संझगिरी

स्कॉटलंड फिरताना म्हणजे विशेषतः हायलॅण्डच्या दऱयाखोऱयांतून जाताना आपण इथे आयुष्यात जरा लवकर यायला हवं होतं असं वाटत राहतं. कारण हायलॅण्डला फिरायला जशी गाडीची गरज आहे तशी मजबूत पायाची आणि निरोगी हृदयाचीसुद्धा. हवा एवढी शुद्ध असते की, दमछाक कमी होते. तरी हसत डोंगर चढणे, उतरणे याला फक्त ‘उत्साह’ अपुरा पडतो. फिटनेस आणि तारुण्याची गरज असते. कारण तरच तुम्ही तिथल्या निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळू शकता. एखादा धबधबा पाहायलाही डोंगरात दीड-दोन किलोमीटर चालायला लागते. निसर्गाच्या मांडीवर गाडीने जाता येतं, पण तिथून पुढे जायला तारुण्य लागतं. आजची पिढी खरंच नशीबवान आहे. योग्य वयात ते युरोप-अमेरिकेत स्थायिक होतात. त्यांचे खिसे गरम असतात, फिरायची हौस असते. ती मंडळी हे स्कॉटलंड पाहणं वगैरे तिशी-चाळिशीत पूर्ण करतात.

मी नशीबवान होतो की, क्रिकेटचे बोट धरून मी खूप जग फिरलो, पण इतर अनेकांची सुरुवातच पन्नाशीत किंवा साठीत होते. त्यामुळे काही गोष्टी लांबून पाहाव्या लागतात किंवा कंडक्टेड टूरच्या बसमधून. त्यामुळे महत्त्वाच्या जागा पाहता येतात, पण निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळणं होतं नाही. स्कॉटलंडमध्ये कॅसल्स (किल्ले) अनेक पाहायला मिळतात. अर्थात त्यांचं आर्किटेक्चर आपल्या किल्ल्यापेक्षा वेगळं असतं, पण तरीही किती पाहणार! मात्र काही नक्की पाहायला हवेत. त्यात एक कॅसल आहे ‘एलियन डोनान कॅसल’. एका चिमुकल्या बेटावर तो किल्ला उभा आहे. तिथे तीन समुद्री तलाव मिळतात. हा किल्ला किनाऱयापासून फक्त एक किलोमीटरवर आहे. किनाऱयाला तो एका पुलाने जोडला गेलाय. तुम्हाला हा किल्ला विविध सिनेमांत दिसेल. त्याची चित्रं तुम्हाला मॅगझिनमध्ये दिसतील किंवा टेलिव्हिजनवर तो तुमच्या डोळ्यांसमोरून जाईल. इतका तो फोटोजेनिक आहे. ‘इलियन डोनान’चा अर्थ ‘डोनानचं बेट’. डोनान हे एका हुतात्मा झालेल्या संताचे नाव आहे. इ.स. 617 साली तो हे जग सोडून गेला. त्याने तिथे चर्च बांधलं असे म्हटलं जातं, पण चर्चचे अवशेष तिथे दिसत नाहीत. आजचा किल्ला तिथे तेराव्या शतकात बांधला गेला. मग त्याने स्कॉटलंडच्या रक्तरंजित इतिहासाचे घाव सोसले. त्या इतिहासाच्या खोलात जायची गरज नाही. जर तुम्ही माझ्याप्रमाणे इतिहासप्रेमी असाल तर स्कॉटलंडच्या इतिहासावर एक नजर टाकून हा किल्ला पाहायला जा. मग तुम्हाला ‘क्लॅन मॅकेन्झी’ किंवा ‘जॅकोबाईट बंडखोर’ वगैरे शब्द अनोळखी वाटणार नाहीत, पण फक्त किल्ल्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर डोळ्याला फारसा त्रास करून घेऊ नका. कारण ते करणं म्हणजे हंपी पाहताना स्कॉटिश माणसाला हरिहर- बुक समजावून सांगण्यासारखं आहे. या किल्ल्याच्या आयुष्यात त्याच्यावरच्या घावांमुळे तो अनेकदा कोलमडला. पुन्हा राहिला, पुन्हा कोलमडला. हे रहाटगाडगं सुरूच होतं. आज जो किल्ला आपण पाहतो तो विसाव्या शतकात लेफ्टनंट कर्नल जॉन मॅकरीगिल स्ट्रपने केलेल्या डागडुजीनंतरचा आहे. आपल्या ऐतिहासिक नेत्यांची ते किती काळजी घेतात पहा. त्या डागडुजीसाठी जॉर्ज मॅकी वॉटसन या एडिंबराच्या आर्किटेक्चरकडे ती जबाबदारी सोपवली गेली. पूर्वीची फारशी ड्रॉइंग्ज अस्तित्वात नव्हती. त्यामुळे तो असलेला किल्ला पाहून ते पूर्वीचे वैभवाचे दिवस कसे असतील याचं काल्पनिक चित्र त्या आर्किटेक्टने उभं केलं आणि मग तो किल्ला पुन्हा उभारला.  त्या किल्ल्याकडे आता आपण दक्षिणेकडून शिरतो आणि आता किल्ल्याकडे जाणारा जो कमानीवर उभारलेला पूल आहे, त्यावरून आपण आत जातो. त्या किल्ल्याचे सौंदर्य हे जास्त आतल्या ओक लाकडाचं छत असलेल्या बॅन्क्वेंट हॉल, गोल टॉवर किंवा बिलेटिंग हॉलमध्ये नाही. त्यापेक्षा कितीतरी श्रीमंत किल्ले जगात आहेत. या किल्ल्याची नैसर्गिक श्रीमंती खूप मोठी आहे. सर्व बाजूला निळं पाणी आणि एका नितांत सुंदर पुलाने त्या पाण्यातल्या किल्ल्याची मुख्य जमिनीला जी नाळ जोडली गेलीय त्यामुळे तो किल्ला सुंदर दिसतो. त्याचे वरून घेतलेले काही फोटोग्राफ मी पाहिले आहेत. ते पाहिल्यावर त्या किल्ल्याचं सौंदर्य जाणवते.

हा किल्ला ‘मॅकरी’ जमातीचा आहे. ही एक स्कॉटिश जमात आहे. 1719 साली हा किल्ला जॅकोबाईट बंड मांडण्यासाठी ब्रिटिश रॉयल नेव्हीनं उद्ध्वस्त केला. वर मी उल्लेख केल्याप्रमाणे हा उद्ध्वस्त किल्ला जॉन मॅकरीगिल स्ट्रपने विकत घेतला. आता त्यावर मॅकरी कुटुंबाच्या ट्रस्टची मालकी आहे. 1955 साली तो आम जनतेसाठी खुला झाला. दरवर्षी हजारो माणसं तो पाहायला येतात. पर्यटकांच्या संख्येचा विचार केला तर तो स्कॉटलंडमधला तिसरा सर्वात लोकप्रिय किल्ला ठरावा. अनेक हॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग्ज या किल्ल्यात झालेले आहे. अगदी 1948 च्या ‘बॉनी प्रिन्स चार्ली’पासून आपल्या बॉलीवूडच्या ‘कुछ कुछ होता है’च्या गाण्याचं शूटिंग या किल्ल्यात झालं होतं. तिथून बहुदा जवळच एक ग्लेन फिनान व्हायाडक्ट आहे. व्हायाडक्ट म्हणजे रेल्वे किंवा रस्त्यासाठी दरीवर बांधलेला लांबलचक पूल. दोन खांबांवर एक कमान उभी केली जाते. अशा अनेक कमानींचा तो पूल तयार होतो. इथे स्कॉटलंडमधला हा पूल अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यावरून धुराच्या इंजिनाची गाडी जाताना पाहणे हा प्रचंड आनंद आहे. त्या ब्रिजवरून जायचा अनुभव मी घेतला नाही, पण जवळून त्यावरून बागडत जाणारी आगगाडी पाहिली. 118 वर्षांपूर्वीचा तो पूल आहे. वर एकच रेल्वे ट्रक आहे. त्याला 21 कमानी आहेत आणि सर्वात मोठी कमान 15 मीटरची आहे. अशी एक गोष्ट सांगितली जाते की, त्या पुलाच्या बांधकामाच्या वेळी एक घोडागाडी एका मोठय़ा खांबाच्या कांक्रीटमध्ये पडली. प्रा. रोनाल्ड पॅक्स्टनला वाटलं की, घोडा खांबाच्या बांधकामात पडणं ही आख्यायिका आहे की खरी कहाणी ते पाहावे. त्याने दोन मोठय़ा खांबांना ज्यात घोडा जाऊ शकतो अशी दोन लहान भोकं करून त्यात कॅमेरे सोडले, पण दगडाशिवाय काहीही सापडलं नाही. 2001 साली स्कॅनिंगचे तंत्रज्ञान आलं. त्यात चक्क घोडागाडीचे अवशेष सापडले. ती आख्यायिका खरी ठरली. अनेक चित्रपटांत त्या पुलाचे चित्रीकरण झालंय. विशेषतः ‘हॅरी पॉटर’मध्ये. तो पूल पाहताना मी कधी बालपणात शिरलो आणि पुलावर धुरांच्या रेषा काढत आगगाडी आली तेव्हा किती फोटो काढत गेलो हे कळलंच नाही. नंतर आजूबाजूला पाहिलं तर चाळिशीच्या पुढची अनेक लहान मुलं तोच उद्योग करत होती. स्कॉटलंड खरंच वय विसरायला लावतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या