महाजनांना पुण्याच्या बुधवारपेठेत  पाठवले पाहिजे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

भाजपचे आमदार गिरीश महाजन कोरोनो पॉझिटिव्ह आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्काच्या भीतीने महाजन यांना दुसऱयांदा कोरोनाची लागण झाली असावी, असा टोला हाणला होता. त्यावर नाथाभाऊंना मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे, असे प्रत्युत्तर महाजनांनी दिले होते. यावर खडसे यांनी पुन्हा एकदा महाजनांना सुनावले असून मला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज नाही, पण गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवारपेठेत पाठवले पाहिजे, असे म्हटले आहे.

जळगावात महाजन आणि खडसे यांच्यातील कलगीतुरा कधी ना कधी या ना त्या निमित्ताने रंगतच असतो. आता निमित्त झाले ते महाजनांना कोरोनाची बाधा झाल्याचे. बोदवड येथे पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीतीपोटी त्यांना दुसऱयांदा कोरोनाची लागण झाली असावी, असा टोला हाणला होता.

काय म्हणाले होते महाजन

एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचारतज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे. ईडीची नोटीस मिळताच एका महिन्यात चार वेळेस कोरोनाचे खोटे सर्टिफिकेट त्यांनी मिळवले आहे. जावई सहा महिन्यांपासून जेलमध्ये आहे. आपण जेलच्या उंबरठय़ावर आहात. गृहमंत्र्यांवर दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करवून घेतला. जनता सर्व जाणून आहे. भविष्यात काय होणार याची चिंता तुम्ही करा.