
मी चाळीस वर्षांपासून भाजपमध्ये आहे. पण गेल्या दहा-बारा वर्षांत उदयास आलेले आलेले नेते आता आम्हाला राजकारणात अक्कल शिकवायला लागलेत. पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षांतर्गत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्या स्वार्थी राजवारणावर जोरदार टीकास्त्र सोडले. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर भाजपाचे सरकार आणले होते. त्या कालखंडात आता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. पक्षात अलीकडे उदयास आलेले नेते आता चमकायला लागलेत, असा टोला त्यांनी लगावला.
मी गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे, मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असे मला वाटते. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी सर्व राज्यभर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ
महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला राज्यात उलथापालथ होईल असे आपल्याला वाटत नाही. भाजपला जर सत्तेत यायचे असेल तर केवळ काही आमदार फोडून नाही तर एखादा पूर्ण पक्ष भाजपसोबत यायला पाहिजे, मात्र ही भाबडी आशा आहे. सध्या तरी असे होईल अशी परिस्थिती नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
मी पुन्हा येणार हे जनतेला आवडले की नाही?
मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? याचा शोध मी घेत आहे. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एकहाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता तर केंद्रात आपले सरकार होते, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकूल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.
























































