भाजपचे आमदार क्रॉस व्होटींगला तयार होते! काँग्रेसकडून विधान परिषदेची होती ऑफर , एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडून आपल्याला ऑफर देण्यात आली होती, ही ऑफर मी स्वीकारली असती तर भाजपच्या 6-7 आमदारांनी क्रॉसव्होटींग करण्याची तयारी दर्शवली होती असा गौप्यस्फोट भाजप असे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे कमालीचे अस्वस्थ झाले असून दररोज नवनवे गौप्यस्फोट करताहेत. कोरोना संकट संपल्यावर लॉकडाऊन नंतर मोठा राजकीय निर्णय घेण्याचे सूतोवाच दोन दिवसांपूर्वी करणाऱ्या खडसे यांनी महाविकास आघाडीत काँग्रेसकडून सहाव्या जागेसाठी विधानपरिषदेची ऑफर देण्यात आली होती पण आपण ती नाकारल्यामुळेच काँग्रेसने सहावी जागा लढण्यास नकार दिला, असा दावा केला आहे.

भंडारी केळकर उपाध्ये यासारख्या निष्ठावंतांवरही अन्याय
आम्हाला तिकीट मिळाले नाही याचे दुःख नाही. पण ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षाविरोधात काम केले अशा पक्षाबाहेरून आलेल्या लोकांना तिकीट देण्यात आले. त्याऐवजी माधव भंडारी, मिलिंद पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, केशव उपाध्ये यांच्यासारखे लोक वर्षानुवर्षे निष्ठेने काम करतात त्यांच्यावर हा अन्याय आहे असे खडसे म्हणाले.

भाजप नेत्यांकडून दगाफटका
राज्यसभेच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले होते की तुम्हाला आता नाही तर विधान परिषदेवर संधी दिली जाईल. मात्र आताही आमची नावे असताना आम्हाला संधी नाकारण्यात येऊन भाजपमधील काही नेत्यांनी दगाफटका केला. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारसी केल्या होत्या त्यामध्ये आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांची नावे नव्हती असे म्हणत खडसे यांनी भाजपच्या राज्य आणि दिल्लीतील नेत्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला.