
राज्याचे माजीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. याप्रकरणी सुरुवातीला केवळ सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे सांगितले जात होते. मात्र या घटनेत चोरर्ट्यानी खडसे यांच्या घरातून ३५ हजार रुपये रोकड, ८ तोळे सोने, काही भेटवस्तू, २० सीडींपैकी १३ सीडी, पेन ड्राईव्ह आणि काही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याच्या खडसे यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. याबाबत खुलासा करताना खडसे यांनी या घटनेमागे नियोजनबद्ध हेतू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच खडसे यांनी माध्यमांशी बोलताना ही फक्त चोरी नाहीतर नियोजनबद्ध घटना आहे. चोरीला गेलेली सीडी साधी नव्हती, माझ्या बेडरूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती, आणि तीच गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात २७ ऑक्टोबर रोजी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला. सहा ते सात तोळे सोने तसेच ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. मात्र तपासात घरातील काही सीडी, पेनड्राईव्ह आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याचे खडसे यांच्या लक्षात आले. त्यामुळे या चोरीमागे नेमका हेतू काय होता, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, मुंबईहून एकनाथ खडसे बुधवारी जळगावातील चोरी झालेल्या घराची पाहणी केली व या प्रकरणात सीडी आणि कागदपत्रांचा नेमका मजकूर काय होता, याबद्दल आता जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पथदिवे बंद, वॉचमन सुटीवर
घटनेच्या मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी परिसरातील पथदिवे बंद करण्यात आले होते. याच काळात चोरी झाल्याचे खडसे यांनी सांगितले. त्यामुळे ‘ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही. याची प्लॅनिंग आधीच झाल्याची शक्यता आहे, असे नमूद करीत त्याचवेळी दिवाळीच्या निमित्ताने वॉचमन सुटीवर होता, असे सांगितले.



























































