
>> राजेश चुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विभागांच्या कामांना गती देण्यासाठी 100 दिवसांची सुधारणा मोहीम घेतली होती; पण यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहनिर्माण विभाग अद्याप मागेच असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. या कार्यक्रमातील 66 उद्दिष्टांपैकी 21 उद्दिष्टे गृहनिर्माण विभागाला अजूनही गाठता आलेली नाहीत. त्यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सर्वेक्षण, गिरणी कामगारांच्या घरांच्या भूमिपूजनाचे उद्दिष्ट सफल करता आलेले नाही.
आता 150 दिवसांचा कृती आराखडा
100 दिवसांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी आता 150 दिवसांच्या कृती आराखडय़ाचे आदेश दिले आहेत. पण अद्याप अनेक विभागांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमांमधील उद्दिष्टांची पूर्तता झाली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहनिर्माण विभाग आघाडीवर आहे.
अपूर्ण उद्दिष्टे आणि आणि सद्यस्थिती
1. महाराष्ट्र निवारा निधीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची कार्यवाही अद्याप अपूर्ण.
2. म्हाडाच्या विविध संवर्गाचे सेवाप्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही अद्याप अपूर्ण
3. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)1.0 रूफ टॉपपर्यंत बांधकाम झालेल्या सुमारे 34 हजार 899 घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट अद्याप अपूर्ण (16 हजार 226 घरांचे बांधकाम अपूर्ण. फक्त 18 हजार 673 घरांचे बांधकाम पूर्ण)
4. पाच हजार गिरणी कामगारांच्या घराचे डीपीआर मंजूर करून भूमिपूजन करण्याचे काम अपूर्ण (गिरणी कामगारांच्या संबंधित बाबी तपासण्याचे निर्देश दिले आहेत.)
5 .एसआरए इज ऑफ डुइंग बिझनेस नोंदी. वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षण. विकासकाची नोंदणी. कार्यवाही अपूर्ण(नोंदणी प्रक्रियेच्या अनुषंघाने निविदा काढली असून कार्यवाही सुरू.)
6. अंधेरीत 1 हजार 300 कोटी रुपयांच्या पूनमनगर पीएमजीपी कॉलनी भूमिपूजन अपूर्ण (म्हाडाच्या निविदेला प्रतिसाद नाही.)