माझ्या मुलाला सांगेन, तुला वडीलच नाहीत! एकता कपूरचा खुलासा

2445

छोट्या पडद्यावरच्या मालिकांची क्वीन अशी ओळख असलेली निर्माती एकता कपूर हिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एका जाहीर मुलाखतीत तिने आपल्या मुलाला त्याचे वडीलच नाहीत, असं सांगणार असल्याचा खुलासा केला आहे.

एकता कपूर हिला सरोगसी पद्धतीने झालेला सात महिन्यांचा मुलगा आहे. आई म्हणून आपल्या आयुष्यात आलेल्या बदलांविषयी तिने इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019मधील मुलाखतीत खुलासे केले. आई झाल्यानंतर अनुभवलेली पहिली भावना कोणती, प्रेम की अपराधीपणा, अशा प्रश्नावर तिने अपराधीपणा असं उत्तर दिलं. गेल्या सात महिन्यात आपण अनेकांचे अनेक सल्ले ऐकल्याचं एकता यावेळी म्हणाली. एक स्त्री जेव्हा आई होते, तेव्हा तिच्या आजूबाजूची माणसं सतत तिला सल्ले देत असतात, तिच्यावर आई या शब्दाचं दडपण निर्माण करत असतात. यात विशेषतः स्वतः आई असलेल्या स्त्रियांचा समावेश असतो. त्यामुळे नव्याने आई झालेल्या महिलेला अपराधीपणा वाटायला लागतो, असं एकता म्हणाली.

‘मीही गेल्या सात महिन्यात याच प्रक्रियेतून गेले आहे, किंबहुना जात आहे. अखेर मी या सगळ्याला वैतागले आणि एक दिवस माझ्या मुलाशीच मी याबाबत गप्पा मारल्या. मी त्याला म्हणाले की, मीही त्याच्यासोबत काही गोष्टी नव्याने शिकतेय. मी माझ्या मुलाला कधीच परीकथा सांगणार नाही किंवा त्याला एखादी गोष्ट सांगणं टाळणार नाही. उलट सर्वात आधी मी त्याला हे सांगेन की तुला वडीलच नाहीत. मला माहीत आहे की, मी एकदम परफेक्ट मॉम नाही आणि मला तसं बनायचंही नाही, असं मत एकता हिने व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या