
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लागोपाठ दिलेल्या दणक्यांनंतर निवडणूक आयोग कामाला लागला आहे. मतदारयादीत नाव जोडण्याच्या वा काढण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेत सुधारणा केल्यानंतर आयोगाने आता मतमोजणीतील गोंधळ कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यापुढे सर्व पोस्टल मते मोजून झाल्यानंतरच ईव्हीएम मतांची शेवटून दुसऱ्या फेरीची किंवा शेवटच्या फेरीची मोजणी सुरू केली जाणार आहे.
सध्याच्या नियमानुसार, निवडणूक निकालाच्या दिवशी 8 वाजता पोस्टल मतांची मोजणी सुरू होते. त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएम मतांच्या मोजणीला सुरुवात होते. दोन्ही मतांची मोजणी समांतर सुरू असते. सर्वसाधारणपणे पोस्टल मते कमी असल्यामुळे त्यांची मोजणी लवकर पूर्ण होते. मात्र, अनेकदा ईव्हीएम मतांची मोजणी संपल्यानंतरही पोस्टल मतांची मोजणी सुरूच असायची. हा गोंधळ टळावा व मतमोजणीत सुसूत्रता यावी म्हणून आता यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, त्या-त्या मतदान केंद्रांवरील पोस्टल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम मतांची शेवटच्या किंवा शेवटून दुस्रया फेरीची मोजणी सुरू होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतमोजणी प्रक्रियेतील हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
कर्मचारी वाढवण्याच्याही सूचना
निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील नागरिकांना व दिव्यांगांना पोस्टल व ई-पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पोस्टल मतांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्यामुळे ज्या मतदान केंद्रांवर पोस्टल मतांची संख्या जास्त असेल, तिथे पुरेसे कर्मचारी व मतमोजणी टेबलांची व्यवस्था निवडणूक अधिकायांनी करावी, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.




























































