
एकाचवेळी दोन-दोन जागांवर निवडणूक लढवणाऱया उमेदवारांना निवडणूक आयोग मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. त्याला दुसऱया जागेवर रिंगणात उतरण्यास मुभा देऊ नये. तसेच जनमत चाचण्या आणि एक्झिट पोलवर बंदी लागू करावी, अशी भूमिका घेत नवे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यासंबंधी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
निवडणूक आयोगाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवीन मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे बदल करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहे. याच हेतूने निवडणूक आयोगाने मतदार कार्ड आधारशी लिंक करणे, जनमत चाचण्या आणि एक्झिट पोलवर बंदी घालणे यासह इतर सहा महत्त्वाच्या मागण्यांबाबत केंद्रीय विधी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. आयोगाचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लोकप्रतिनिधी कायदा, 1951च्या कलम 37(1)मध्ये मोठा बदल होणार आहे. त्यानुसार एका उमेदवाराला एकाच जागेवरून निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे दोन जागांवर नशीब आजमावणाऱया उमेदवारांचा अपेक्षाभंग होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रस्तावातील प्रमुख मागण्या
मतदार कार्ड आधारशी लिंक करण्यासंबंधी तसेच नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी चार कट-ऑफ तारखांशी संबंधित नियम जारी करा.
एका उमेदवाराला दोन जागांवरून निवडणूक लढवण्यास बंदी घाला. त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा, 1951च्या कलम 33(7) मध्ये दुरुस्तीला मंजुरी द्या.
राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे सोपवा.
जनमत चाचण्या आणि एक्झिट पोलवर बंदी असावी. निवडणुकीच्या पहिल्या अधिसूचनेच्या दिवसापासून सर्व टप्प्यांतील निवडणूका पूर्ण होईपर्यंत जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर करण्यास बंदी घालावी.

























































