
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळ विरोधी पक्षांनी पुराव्यासह समोर आणला. त्यानंतरही निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याने 1 नोव्हेंबरला आयोगाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महामोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला धडकी भरली असून आज निवडणूक आयोगाने मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरीचे आरोप झाले. 48 लाख मतदार वाढले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये त्यासंदर्भात सादरीकरण करून त्याचे पुरावेच दाखवले होते. राज्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन मतदार यादीमधील घोळ दाखवून दिला होता. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.
विरोधी पक्षांच्या मागणीनंतरही निवडणूक आयोगाने काहीच कारवाई न केल्याने 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय विराट महामोर्चा काढला जाणार आहे. सत्ताधारी वगळता सर्वच पक्षांकडून मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचा धसका घेत आज निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील दुबार नावांची तपासणी करून ती वगळण्याची कार्यवाही करावी असे निर्देश जारी केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय तसेच जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजित केली जाते. या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी केले होते पॉवरफुल प्रेझेंटेशन
सोमवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांनी पॉवरफुल प्रेझेंटेशन केले होते. वरळी मतदारसंघातील दुबार मतदार, मतदारांची नावे, पत्ते, आडनाव, लिंग व मतदान कार्डमधील घोळ पुराव्यांसह मांडला होता. त्यानंतर दोनच दिवसांत आयोगाने दुबार मतदार तपासण्याचे पाऊल उचलले.
हमीपत्र लिहून घेणार
नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र तपासून साम्य आढळल्यास अशा दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रावर मतदान करणार, याबाबत अर्ज घेणार. अर्ज दिला नाही तर मतदाना दिवशी मतदान पेंद्रावर त्याने इतर कुठेही मतदान केले नाही आणि करणार नाही असे हमीपत्र लिहून घेणार.





























































