
महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणासह २३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये येत्या एप्रिलपासून विशेष मतदारयादी पुनर्निरीक्षण (SIR) ची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना तयारी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. निवडणूक आयोगाचे सचिव पवन धवन यांनी यासंदर्भातील पत्र राज्यांना पाठवले आहे.
बिहारमध्ये SIR ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशसह १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये SIR ची प्रक्रिया सुरू आहे. आता संपूर्ण देशात SIR राबवण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या एप्रिलपासून संपूर्ण देशात SIR ची प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना तयारी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी SIR शी संबंधित प्राथमिक तयारी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निवडणूक आयोगाने निर्देशात म्हटले आहे. यामुळे एप्रिल महिन्यात मोहीम कुठल्याही अडथळ्याशिवाय सुरू करता येऊ शकेल.
या राज्यांत सुरू होणार SIR ची प्रक्रिया
महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, चंदीगड, जम्मू-कश्मिर, लडाख, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगण, उत्तराखंड, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीवमध्ये SIR ची प्रक्रिया राबवली जाईल.
























































