
सामना प्रतिनिधी, जामखेड
जामखेड लोकसभा निवडणुकीत हजारो कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना कसलीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. निवडणुकीवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याशिवाय साधा चहा पण दिला जात नाही. यामुळे कर्मचारी वर्गात कमालीची नाराजी पसरली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी, निमशासकीय शाळा कॉलेजचे कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणे सुरू आहेत. नोकरीला असणार्या ठिकाणी आतापर्यंत दोन प्रशिक्षणे झाली आहेत. तिसरे प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघ बदलून देण्यात आले परत चौथे प्रशिक्षण त्याच ठिकाणी नंतर निवडणुकीच्या आगोदर एक दिवस अगोदर त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांना काही गोळ्या औषधे सुरू आहेत. वेळच्या वेळी जेवण मिळणे गरजेचे असते. परंतु प्रशिक्षणामध्ये खूपच हाल होतात. सकाळी नऊ वाजता प्रशिक्षण सुरू होण्याची वेळ आहे. त्यामुळे पहाटे तीन चार वाजताच घर सोडावे लागत आहे. पाच वाजता प्रशिक्षण संपल्यावर घरी येण्यासाठी नऊ दहा वाजतात. नऊ ते पाचपर्यंत निवडणूक आयोगातर्फे फक्त पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते.
काही जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कोठेही साध्या चहाचीही सोय केली नव्हती. यामुळे कर्मचारी वर्गात कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी व निवडणुकीदिवशी कर्मचारी वर्गाचे खाण्यापिण्याचे खूप हाल होतात. काही ठिकाणी तलाठी कोतवाल पैसे घेऊन सोय करतात काही ठिकाणी कसलीही सोय होत नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कर्मचारी वर्गाची सोय करणे गरजेचे आहे.


























































